एच.आय.व्ही संसर्गिताना सन्मानाची वागणूक द्या

न्यायमूर्ती निना बेदरकर; जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅली


स्थैर्य, सातारा, दि. 1 डिसेंबर : एच. आय. व्ही संसर्गिताना सन्मानाची वागणूक देणे ही प्रत्येक समाजातील घटकांची जबाबदारी असून त्यांच्यासोबत भेदभाव होऊ नये याकरिता एच. आय. व्ही / एड्स प्रतिबंध व नियंत्रण कायदा 2017 अस्तित्वात आला आहे. एच.आय. व्ही संसर्गितांच्या संबंधित तक्रारी व खटले लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे प्रतिपादन वरिष्ठ दिवाणी न्यायाधिश्च तथा सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधीकरण, सातारा न्यायमूर्ती निना बेदरकर यांनी केले.

जिल्हा रुग्णालयातील जिल्हा एड्स नियंत्रण विभागाच्यावतीने जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. या जनजागृती रॅली शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. रॅलीस जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष कदम, वैद्यकीय अधिकारी राहुल जाधव, डॉ. चंद्रकांत काटकर, डॉ. कुर्‍हाडे, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्या सरला पुंड, जिल्हा कार्यक्रम अधिकारी हेमंत भोसले आदी उपस्थित होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले, युवकांनी सोशल मिडीयाचा वापर जबाबदारीने व योग्यरित्या शास्त्रीय माहीती मिळविण्यासाठी करावा. अशास्त्रीय माहीती युवकांनी घेऊ नये किंवा अविचाराने इतरांनाही पाठवू नये.

डॉ. युवराज करपे, जिल्हा शल्यचिकित्सक यांनी प्रास्ताविकात जागतिक एड्स दिन 2025 चे घोषवाक्य हे अडथळ्यांवर मात करु, एकजुटीने एचआयव्ही/एड्स थी लढा देऊ, नव परिवर्तन घडवू हे आहे. जिल्हा एड्स नियंत्रण विभाग सातारा मार्फत 117 महाविद्यालयांमध्ये रेड रिबन क्लब स्थापन करण्यात आला आहे. जनजागृती व्याख्याने, पथनाट्य, लोककला, फ्लॅश माँब, प्रश्नमंजुषा, विविध स्पर्धा इत्यादी उपक्रम या क्लबच्या माध्यमातून राबविले जात आहेत.

यावेळी एचआयव्ही/एड्स प्रतिबंध क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल अधिकारी व कर्मचारी यानां मान्यवरांचे हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

रॅलीला मान्यवरांचे हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅली मार्गस्थ करण्यात आली. या रॅली मध्ये सातारा शहरातील व परिसरातील व 20 महाविद्यालयातील 1500 युवक युवतीसह जिल्हा रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी, एड्स नियंत्रण कार्यकम कर्मचारी, विविध सामाजिक संस्था व प्रकल्प यांनी भाग घेतला. कार्यक्रमाचे नियोजन श्री. हेमंत भोसले, जिल्हा कार्यक्रम अधिकारी यानी केले.


Back to top button
Don`t copy text!