स्थैर्य, अकोले, दि.११: गुगल मॅप सर्चच्या भरवशावर प्रवास करताना रस्ता चुकल्याने पुण्यातील दोन उद्योजकांसह वाहनचालक चारचाकी कारसह कोतूळ येथील मुळा नदीपात्रात बुडाल्याची दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनचालक सतीश घुले यास धरणात जलसमाधी मिळाली, तर वाहनातील इतर दोघे उद्योजक शेखर सत्याराज गुरू व समीर राजूरकर पोहून सुखरूप पाण्याबाहेर पडल्याने बचावले.
शनिवारी रात्रीच्या वेळेस कोल्हापूर येथील, पण पुणेस्थित शेखर सत्याराज गुरू व समीर राजूरकर (कोल्हापूर) हे दोन उद्योजक आपल्या चारचाकी वाहनातून अकोल्यातील कळसूबाई शिखरावर ट्रेकिंग करण्यासाठी कोतूळ मार्गाने गुगल मॅप सर्च करून प्रवास करत होते. रात्रीची साधारण दोन वाजेची वेळ होती.
गुगल मॅपवर कोतूळहून अकोल्याकडे जाणारा रस्ता वाहनचालकाला दाखवण्यात आला खरा, पण तो रस्ता पावसाळ्यात पिंपळगावखांड धरणात पाणी अडवल्यावर वाहतुकीस बंद होतो. कारण कोतूळ येथील या मार्गावरील पुलावरून सुमारे २० फूट उंचीचे पाणी असते. मात्र या मार्गाने जाणारा हा वाहनचालक नवखा असल्याने त्याने पाण्यापर्यंत जाणाऱ्या डांबरी रस्त्यावरून गाडी नेली. पाणीसाठ्याचे चित्र पाहून त्याने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, पण गाडी थेट धरणात गेली.