सातारा जिल्ह्यात स्वाभिमानीकडून उस वाहतूक बंद


दैनिक स्थैर्य । दि. १९ नोव्हेंबर २०२२ । सातारा । सातारा जिल्ह्यात गळीत हंगाम सुरू होऊन एक महिना उलटला असला तरी कारखानदारांनी अद्याप एफआरपी जाहीर केली नाही. त्याचबरोबर इथेनॉलचे पैसे मिळावे, ऊसतोड कामगार हे महामंडळाकडूनच मिळावेत. यासह अन्य मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दोन दिवस सातारा जिल्ह्यात ऊसतोड आणि ऊस वाहतूक बंद करण्यात आली. त्यामुळे कारखान्याकडे जाणाऱ्या मार्गावर ऊसाने भरलेली वाहने रस्त्यावरच रोखली आहेत.

याबाबत 23 रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. सातारा जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी व शुक्रवारी दिवसभर ऊसवाहतूक बंद करण्यात आली. ठिकठिकाणी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कारखान्यांवर ऊस घेऊन चाललेले ट्रॅक्टर अडवले. वाहतूक बंद असल्याने फडामध्ये ऊसतोडही बंद असल्याचे दिसून आले.

सातारा जिल्ह्यात ऊसदर जाहीर न झाल्याने स्वाभिमानी संघटनेने पुकारलेल्या दोन दिवस ऊसतोड बंद आंदोलनाला यश मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिकठिकाणी ऊस वाहतूक बंद करण्यात आली आहे. कराड तालुक्यात पोलिसांनी संरक्षण देत वाहने कारखान्याकडे रवाना केली होती. ऊस वाहतूक बंद, ऊस तोड बंदमुळे कारखान्याचे गाळप अल्पशा प्रमाणात सुरू आहे.


Back to top button
Don`t copy text!