
दैनिक स्थैर्य | दि. 12 एप्रिल 2025 | फलटण | भारतीय रेल्वेच्या “अमृत भारत स्टेशन” योजनेंतर्गत महाराष्ट्रातील एकूण 132 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशभरातील महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यात येणार असून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. यामध्ये फलटण रेल्वे स्थानकाचा सुद्धा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेवेळी ही माहिती देण्यात आली. महाराष्ट्रातील रेल्वेच्या दर्जेदार पायाभूत सुविधेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री वैष्णव यांचे आभार मानले.
या योजनेमुळे स्थानकांवर प्रवाशांसाठी वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छतागृहे, लिफ्ट्स, एस्कलेटर्स आणि डिजिटल सुविधांसारख्या आधुनिक सेवा उपलब्ध होणार आहेत. तसेच, स्थानकांचे सौंदर्यीकरण आणि शहराशी अधिक सुसंगत दळणवळण व्यवस्था विकसित केली जाणार आहे.
माजी खासदार रणजितसिंह यांच्या प्रयत्नांना यश
फलटण शहरासह तालुक्यातील पत्रकारांना संसदेचे कामकाजाची माहिती देण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी नवी दिल्ली येथे बोलावले होते. त्यावेळी फलटणच्या पत्रकारांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी फलटण रेल्वे स्थानकाच्या दुरावस्थेबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना माहिती दिली होती व अमृत भारत योजनेमध्ये फलटण रेल्वे स्थानकाचा समावेश करावा, अशी मागणी तत्कालीन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली होती. त्यानुसार फलटण रेल्वे स्थानकाचा अमृत भारत योजनेमध्ये समावेश करण्यात आलेला आहे व त्यावर निधी सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे.