राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑगस्ट २०२३ । सातारा । विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याची संधी ग्रामपंचायतींना उपलब्ध झाली आहे.  सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायती शास्वत विकासाची उद्दिष्टपूर्ती निश्चितपणे करतील. शाश्वत विकास उद्दिष्टांबाबत जाणीव जागृती करण्यासाठी राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत, तालुका, जिल्हा विकास आराखड्यासंबंधीचे प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा परिषदेचे सर्व खाते प्रमुख, राज्य यंत्रणांचे जिल्हास्तरीय विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा सातारा येथील हॉटेल लेक व्ह्यू येथे संपन्न झाली.

यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किशोर हराळे, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  अर्चना वाघमळे, पाणी आणि स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  क्रांती बोराटे, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी अविनाश देशमुख ,  कृषी अधिकारी विजय माईनकर, जिल्हा माहिती अधिकारी वर्षा पाटोळे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर यांच्यासह विविध यंत्रणांचे प्रमुख , गटविकास अधिकारी उपस्थित होते. या कार्यशाळेत यशदाचे प्रशिक्षक सुरेंद्र चव्हाण आणि विद्याधर गायकवाड यांनी मार्गदर्शन केले.

शाश्वत विकासाचे आराखडे बनविण्याची प्रक्रिया गेल्या तीन वर्षापासून सुरू असून ती समजून घेण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांनी केले.

जगभरातील 193 देशांनी एकत्र येऊन संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखाली शाश्वत विकास उद्दिष्टे निश्चित केली आहेत. त्यातील नऊ संकल्पना केंद्र सरकारने स्वीकारलेल्या आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये जलसमृद्ध गाव , स्वच्छ व हरित गाव आणि स्वयंपूर्ण पायाभूत सुविधायुक्त गाव या संकल्पनांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत विकास आराखड्याच्या माध्यमातून शाश्वत विकासाची उद्दिष्टे साध्य करण्याची संधी ग्रामपंचायत यांना उपलब्ध झाली आहे.

सर्वसमावेशक ग्रामपंचायत विकास आराखडा तयार करण्यासाठी गाव पातळीवरील ग्राम संसाधन गटांची क्षमता बांधणी करणे गरजेचे आहे. ही गरज विचारात घेऊन राज्य शासनाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियानांतर्गत विविध प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यशदा, पुणे या शिखर संस्थेमार्फत प्रवीण प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात येत आहे.  या कार्यशाळेत  कार्यशाळेत सुरेंद्र चव्हाण यांनी पंधरावा वित्त आयोग उद्देश व महत्त्व या विषयावर मार्गदर्शन करत असताना शाश्वत विकास ध्येयांची मांडणी आणि शाश्वत विकास ध्येयासाठी भारताची नवरत्न संकल्पना याबाबत मार्गदर्शन केले. तर विद्याधर गायकवाड यांनी विकास आराखडा तयार करत असताना अंमलात आणावयाची मार्गदर्शक तत्वे , जिल्हा पंचायत नियोजन समितीची रचना व कार्य याबाबत मार्गदर्शन केले.

या कार्यशाळेत गरिबीमुक्त आणि उपजीविका(रोजगार) वृद्धीस पोषक गाव , आरोग्यदायी गाव, बालस्नेही गाव , जलसमृद्ध गाव, स्वच्छ आणि हरित गाव पायाभूत सुविधा युक्त गाव, सामाजिक दृष्ट्या सुरक्षित गाव, सुशासन युक्त गाव आणि महिला स्नेही गाव या शाश्वत विकास ध्येयांच्या नऊ संकल्पनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.


Back to top button
Don`t copy text!