ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढण्यास प्रशिक्षण कार्यक्रम उपयुक्त – सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ०७ डिसेंबर २०२१ । मुंबई । टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने राबवला जाणारा प्रशिक्षण कार्यक्रम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेची गुणवत्ता वाढवण्यास उपयुक्त ठरेल, असा विश्वास सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केला आहे.

टेमासेक फाऊंडेशन, सिंग हेल्थ आणि महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, डिझाईन अँड फ्लो कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी श्री. राजेश टोपे बोलत होते.

दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या या कार्यक्रमात टेमासेक फाऊंडेशनचे समुह मुख्य कार्यकारी अधिकारी प्रो, आयव्ही, टेमासके फाऊंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी बेनेडिक्ट थेओंग, प्रो. टँग, प्रो. ओंग, श्रीमती विजया राव आदी दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. टोपे म्हणाले, सिंग हेल्थ आणि टेमासिक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणारा प्रशिक्षण उपक्रम ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेचे परिचालन आणि रुग्ण सेवेचा दर्जा उंचावण्यास निश्चितच उपयुक्त ठरेल. राज्यातील आरोग्य व्यवस्थेत चांगले बदल आणण्यासाठी सिंग हेल्थने महाराष्ट्रात सेंटर फॉर एक्सलन्स उभे करावे. राज्यातील सार्वजनिक रुग्णालये आणि सिंग हेल्थ यांच्या सहकार्यातून राज्यातील आरोग्य व्यवस्थेत विविध सेवा प्रारुपे विकसित करण्यासाठी सहकार्य केले जावे, अशी अपेक्षाही श्री. टोपे यांनी व्यक्त केली.

सिंग हेल्थ म्हणजेच सिंगापूर मधील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था होय. हॉस्पिटल इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग, डिझाईन अँड फ्लो या प्रकल्पातून महाराष्ट्रातील 10 विशेष तज्ज्ञ आणि 10 आरोग्य व्यवस्थेतील प्रमुखांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणात प्रत्येकी पाच दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष पाच दिवस सिंगापूर सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या रुग्णालयात प्रशिक्षण दिले जाणार आहे. रुग्णाचा प्रवास, रुग्णाची सुरक्षितता, गुणवत्ता सुधारणा, आरोग्य व्यवस्थेचे प्रशासन या विषयावर मार्गदर्शन केले जाणार आहे.


Back to top button
Don`t copy text!