
दैनिक स्थैर्य | दि. ०२ फेब्रुवारी २०२३ | फलटण | द आर्ट ऑफ लिव्हिंगचे परमपूज्य श्री श्री रविशंकरजी गुरूदेव यांचे ३ फेब्रुवारीला फलटणमध्ये आगमन होत आहे. त्यानिमित्त द आर्ट ऑफ लिव्हिंग आणि आंतरराष्ट्रीय मानवीमूल्य संस्था अंतर्गत प्रोजेक्ट पवित्र हा महिला आरोग्य, स्वच्छता व स्वास्थ्य याविषयीचा कोर्स सौ.वेणूताई चव्हाण गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, फलटणमध्ये २३, २४ व २५ जानेवारीला आयोजित करण्यात आला होता. श्रीराम एज्युकेशन सोसायटी फलटणचे मानद सचिव डॉ. श्री सचिन सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच असे उपक्रम राबवतात. हा कोर्स घेण्यासाठीही त्यांचे विशेष सहकार्य मिळाले.
यावेळी डॉ. सौ. अलका पोळ म्हणाल्या, स्त्रीला निसर्गाने सहनशीलतेचे वरदान दिले आहे, त्यामुळे ती वेगळ्यवेगळ्या सर्व जबाबदार्या पार पाडते. परंतू ती स्वतःकडे दुर्लक्ष करते. तर तिने चांगला आहार घेतला पाहिजे. थोडावेळ स्वतःसाठी काढून योगा, प्राणायाम, ध्यानही केले पाहिजे. यामुळे ती जबाबदार्या पार पाडण्यासाठी अजून सक्षम होईल. विद्यार्थिनींनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडता स्वतःच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले पाहिजे व आपले ध्येय गाठले पाहिजे.
डॉ. सौ.निलिमा दाते, सौ.सुनिता नायर, सौ. जयश्री उपाध्याय, सौ. पदमा बोरकर, सौ.मनिषा वाघमारे व डॉ.कु. कोकिळा चांगण यांनी हा कोर्स घेतला. या कोर्समध्ये वेगवेगळे व्यायाम, योगासने, प्राणायाम व ध्यान शिकवण्यात आले. सौ. वेणूताई चव्हाण हायस्कूलच्या प्राचार्या प्रा. रायते मॅडम, पर्यवेक्षिका गायकवाड मॅडम यांनी या कोर्सचे आयोजन करुन विशेष सहकार्य केले.
आर्ट ऑफ लिव्हिंग अॅडव्हान्स कोर्स टिचर व फलटणमधील सुप्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. माधव पोळ, आर्ट ऑफ लिव्हिंग टिचर व फलटण विभाग टिचर कोऑर्डिनेटर (बिल्डर अॅण्ड कन्स्ट्रक्टर) श्री दादासाहेब कदम तसेच फलटण आर्ट ऑफ लिव्हिंग फायनान्स फॅसिलिटर श्री प्रविराज नाळे (आण्णासाहेब) यांच्या मार्गदर्शनाखाली हा कोर्स घेण्यात आला.