प्रशिक्षणातून नेतृत्व गुण विकसित होतात : दिलीपसिंह भोसले

'श्रीराम बझार'च्या कर्मचाऱ्यांसाठी सहकार प्रशिक्षण संस्थेतर्फे एक दिवसीय कार्यशाळा संपन्न


स्थैर्य, फलटण, दि. १८ ऑगस्ट : “सहकार क्षेत्रातील सर्व कर्मचारी व संचालकांना प्रशिक्षणाची आवश्यकता असून, प्रशिक्षणाच्या माध्यमातून नेतृत्व आणि कौशल्य गुण विकसित करून स्वतःला सिद्ध करण्याची संधी मिळते,” असे मत सद्गुरु उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी व्यक्त केले. श्री सद्गुरु हरिबुवा महाराज सहकार प्रशिक्षण संस्थेमार्फत ‘श्रीराम बझार’च्या संचालक व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

ही एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून श्रीराम बझारच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. कार्यशाळेचे उद्घाटन फलटणचे सहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) जे. पी. गावडे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना गावडे म्हणाले, “सहकार क्षेत्राला अत्याधुनिक प्रशिक्षणाची नितांत गरज असून, तालुक्यात सहकार प्रशिक्षण संस्थेच्या रूपाने एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे.”

या कार्यशाळेत पुणे येथील सुप्रसिद्ध प्रशिक्षक प्रा. डॉ. सचिन वाडेकर आणि प्रा. डॉ. सुनील धनगर यांनी नेतृत्व गुण, आत्मविश्वास, निर्णय क्षमता आणि कामाचे नियोजन यांसारख्या विषयांवर उपयुक्त मार्गदर्शन केले.

याप्रसंगी श्रीराम बझारचे चेअरमन जितेंद्र पवार, व्हा. चेअरमन दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ संचालक महादेवराव पवार, सहकार प्रशिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन ज्येष्ठ पत्रकार रवींद्र बेडकिहाळ, चेअरमन ॲड. शितल अहिवळे व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड. शितल अहिवळे यांनी केले, तर आभार श्रीराम बझारचे जनरल मॅनेजर अनंत पाटील यांनी मानले.


Back to top button
Don`t copy text!