दैनिक स्थैर्य । दि. ०१ डिसेंबर २०२१ । सातारा । सातारचे सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉक्टर नितीन लवंगारे हे निष्णात डॉक्टर होते. परंतु ते जेव्हा राजकारणात सक्रिय झाले त्यावेळी ते राजकारणाचाच बळी ठरले आणि ही त्यांच्या जीवनाची शोकांतिका ठरली असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडकीहाळ यांनी डॉ. नितीन लवंगारे यांना आदरांजली वाहताना व्यक्त केले
डॉ. नितीन लवंगारे यांच्या निधनाबद्दल त्यांना त्यांचा मित्रपरिवार व नातेवाईक यांच्या वतीने सातारा येथील श्री छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय सातारा च्या पाठक हॉलमध्ये श्रद्धांजलीसाठी शोकसभा आयोजित केली होती त्यावेळी अध्यक्षस्थानावरुन किशोर बेडकीहाळ बोलत होते.
किशोर बेडकीहाळ यांनी डॉ. नितीन लवंगारे यांच्या चतुरस्त्र व्यक्तिमत्त्वाचा वेध आपल्या मनोगतात घेतला.
यावेळी बोलताना ज्येष्ठ साहित्यिक व कवी प्रमोद कोपर्डे यांनी राजकारणात शोकांतिका झालेले डॉ नितीन लवंगारे हे नंतरच्या काळात क्रिएटिव्हिटी कडे आणि त्यांच्या स्वत:च्या अनुभवावर आधारित अशी ‘ निष्कर्ष ‘ ही कादंबरी त्यांनी लिहिली. या कादंबरीवर ” आघात ” हा मराठी चित्रपटही काढण्यात आला होता असे सांगितले आणि डॉ नितीन लवंगारे हे कसे मनस्वी साहित्यिक होते हे विषद केले. स्पष्टवक्ता , निर्भिड , चांगला कबड्डीपटू , सुवर्णपदक विजेता असलेले डॉ नितीन लवंगारे यांच्यावर राजकीय अन्याय झाला असे प्रतिपादन विजय मांडके यांनी केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिनकर झिंब्रे , सुभाष जाज , सुधीर पवार , रमेश शिंदे , रमेश लवंगारे यांनीही मनोगत व्यक्त केले. या शोकसभेचे संयोजन डॉ लवंगारे यांची भाची राधिका हंकारे हिने केले होते. प्रारंभी डॉ लवंगारे यांच्या प्रतिमेस उपस्थितांनी पुष्पांजली वाहून अभिवादन केले आणि दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी मंगला हंकारे,शेखर कुलकर्णी, निखिल लवंगारे, कल्पना पवार,रोहित हंकारे, सपना लवंगारे,विकास गवळी, विश्र्वास वाघ , गौतम भोसले , राजेंद्र लावंघरे , भगत आदी उपस्थित होते.