स्थैर्य, मेढा, दि. १० : गेल्या आठवडय़ात मान्सून सातारा जिह्यात जोरदार आगमन केले होते. त्यानंतर हवामानात बदल होऊन पावसाने दडी मारली होती. मात्र, सकाळी पुन्हा जिह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. धरण परिसरात पावसाच्या रिपरिप सुरू आहे. सातारा शहरात दिवसभर सरीवर सरी पडत आहेत. पडत असलेल्या पावसामुळे पश्चिम भात लागणीच्या कामांना वेग आला आहे. महाबळेश्वर येथे सकाळी आठ वाजेपर्यंत 122.35 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक तलाव भरला आहे. तसेच केळघर घाटात दरडी कोसळू लागल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. दुष्काळी खटाव–माण तालुक्यात अजून पावसाची प्रतिक्षा आहे. दरम्यान, हवामान खात्याने मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
सातारा जिह्यात गेल्या आठ दिवसांपूर्वी पावसाने जोर वाढवला होता. मात्र, लगेच दोन दिवसांनी वाऱ्याच्या वेगामुळे पावसाचे प्रमाण कमी झाले. आलेले पीक वाया जाते काय?, दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले होते. रात्रीपासून पुन्हा वातावरणात बदल होऊन सकाळपासून जिह्यातील पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. सातारा, जावली, महाबळेश्वर, कराड, पाटण आणि वाई या तालुक्यात पाऊस सुरू होता. सातारा शहरात दिवसभर सरीवर सरी कोसळत होत्या. राजवाडा, राधिका रोड, गोडोली या परिसरात चांगला पाऊस झाला. या पावसाने पश्चिम भागात भात लागणीच्या कामानी वेग घेतला आहे. महाबळेश्वर येथील वेण्णा लेक तलाव भरून वाहत आहे. पर्यटकांसाठी पावसाळ्यात महत्वाचे ठिकाण कोरोनामुळे ओसाड पडले आहे. सुरू असलेल्या पावसाने धबधबे फेसळुन वाहत आहेत. हवामान विभागाने सातारा जिह्यात आज व उद्या असे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.