ऐतिहासिक शिवकालीन राजमार्गावरील वाहतूक होणार सुरळीत

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि.१० मार्च २०२२ । सातारा । भारताचे मिनी काश्मीर अशी ओळख असलेल्या महाबळेश्वरला जागतिक वारसास्थळ कास पठाराला जोडणारा शिवकालीन ऐतिहासिक राजमार्ग आता बाराही महिने सुरळीत सुरु राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पावसाळ्यात जावली तालुक्यातील ओखवडी, भवानीनगर येथे हा रस्ता दरवर्षी खंडित होऊन पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना मोठी अडचण होत होती. मात्र आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पाठपुराव्यामुळे वन विभागाच्या हद्दीतील सुमारे ४०० मीटर रस्ता करण्यास परवानगी मिळाल्याने शिवकालीन राज्यमार्गावरून कास ते महाबळेश्वर अशी कायमस्वरूपी वाहतूक सुरु होणार आहे.

कास ते महाबळेश्वर असा सुमारे ३० किलोमीटरचा जुना शिवकालीन राजमार्ग आहे. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या अथक पाठपुराव्यातून कास आणि महाबळेश्वर या राजमार्गाचे डांबरीकरण आणि मजबुतीकरणाचे काम पूर्णत्वास गेले आहे. बहुताऊंशी रस्त्याचे संपूर्ण काम मार्गी लागले आहे. दरम्यान, या राजमार्गावर जावली तालुक्यातील ओखवडी, भवानीनगर येथे वनविभागाची हद्द असून या हद्दीतून हा रस्ता जातो. याठिकाणी सुमारे ४०० मीटर रस्ता डांबरीकरण करण्यासाठी वनविभागाची परवानगी मिळणे आवश्यक होते. याठिकाणी रस्ता डांबरीकरण नसल्याने पावसाळ्यात हा राजमार्ग खंडित होऊन या मार्गावरील दळणवळण ठप्प होत असते. हा शिवकालीन राजमार्ग कायमस्वरूपी सुरु होऊन कास ते महाबळेश्वर येणाऱ्या आणि जाणाऱ्या पर्यटकांसह या मार्गावरून प्रवास करणाऱ्या लोकांची गैरसोय दूर करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा पाठपुरावा सुरु होता.

आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचनेनुसार ओखवडी, भवानीनगर येथे वनविभागाच्या हद्दीतून जाणाऱ्या या मार्गात रस्त्याचे काम करण्यास परवानगी मिळण्यासाठी जावली बांधकाम विभागामार्फत वन विभागाकडे प्रस्ताव सदर करण्यात आला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून या प्रस्तावाला मंजुरी मिळवली त्यामुळे राजमार्गावरील वाहतुकीचा प्रश्न कायमस्वरूपी सुटला आहे. कास- एकीव-गाळदेव- माचुतर ते महाबळेश्वर या शिवकालीन जुन्या राज्यमार्गावरील ४०० मीटर हद्दीत काम करण्यास परवानगी मिळाल्याने या राजमार्गावरून कास ते महाबळेश्वर आणि महाबळेश्वर ते कास असा विनाअडथळा आणि वेळेची व इंधनाची बचत करणारा प्रवास पर्यटकांना करता येणार आहे.

याशिवाय राजमार्गावरून या मार्गालगतच्या गावातील ग्रामस्थांना तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणे व दैनंदिन गरजा भागविण्यासाठी मेढा व सातारा येथील बाजारपेठेत ये जा करणे, तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाकरीता हा मार्ग सोयीचा ठरणार आहे. या भागातील ग्रामस्थांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्यायी रस्ता उपलब्ध नसल्याने या राजमार्गाचे काम पूर्णतः मार्गी लागल्याने या भागातील दळणवळणाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत झाली आहे.


Back to top button
Don`t copy text!