दैनिक स्थैर्य । दि. ३० मे २०२३ । फलटण । फलटण शहरामधील फलटण शिंगणापूर या रस्त्यावर असणाऱ्या पृथ्वी चौक येथे वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बनलेली आहे. या ठिकाणी असणारे वाहतूक पोलीस म्हणजे असून अडचण व नसून खोळंबा अशी परिस्थिती पाहायला मिळत आहेत. फलटण शहरामध्ये वाहतुकीची शिस्त लावण्यासाठी नूतन पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी कंबर कसली असून आगामी काळात ते वाहतूक कोंडीवर ठोस पावले काय ? उचलणार याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.
फलटण शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रमुख चौकात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. शहरातील प्रमुख चौकातून जाण्याच्या ऐवजी आता फलटणकर पर्यायी मार्गांचा वापर करताना दिसून येत आहेत. त्यामुळे आता पर्यायी मार्गावर सुद्धा सकाळी व संध्याकाळी वाहतूक प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
फलटणमध्ये गेल्या काही महिन्यांपूर्वी नूतन पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी पदभार स्वीकारला आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर फलटण शहरात वाहतुकीची शिस्त लागण्यासाठी ते स्वतः शहरात फिरताना दिसून येत आहे. शहरात नाना पाटील चौक, पृथ्वी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुना डीएड कॉलेज चौक व गिरवी नाका येथे सकाळी व संध्याकाळी ही वाहतूक कोंडी दिसून येत आहे.