दैनिक स्थैर्य । दि. १ जुलै २०२१ । वाई । वाईहून पांचगणी महाबळेश्वरकडे व कोकणात जाणार्या पसरणी घाटात दुरुस्तीच्या कामामुळे आज बुधवारी वाहतुकीसाठी घाट रास्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात घाटात दिवसभर दुरुस्तीचे काम सुरु होते सायंकाळी घाट रस्ता दुरुस्तीचे काम मोठया प्रमाणात उरकल्याने सायंकाळी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
पसरणी घाटामधील मोर्या व संरक्षक भिंती सततच्या पावसामुळे पडलेल्या आहेत. त्यामुळे सदरचा रस्ता वाहतुकीस धोकादायक झालेला होता. त्याची दुरुस्ती करण्याचे काम प्रगतीपथात आहे. हा रस्ता वाहतुकीस सुस्थितीत करण्यासाठी मोरीचे बांधकाम व संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यासाठी बुधवार सकाळी सहा ते सायंकाळी सहा पर्यंतच्या कालावधीसाठी एक दिवसाकरीता रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आली होती. मोठमोठ्या यंत्रसामुग्री वापरून ही दुरुस्ती सुरु होती, अशी माहिती उपअभियंता श्रीपाद जाधव यांनी दिली.
यामार्गावरून पाचगणी महाबळेश्वर व कोकणात मध्यममार्ग म्हणून मोठी वाहतूक असते. पसरणी घाट दुरुस्तीमुळे वाई, पसरणी, पाचगणी, महाबळेश्वर, पोलादपूर या परिसरातील या भागातील वाहतूक दिवसभर बंद राहणार असल्याची माहिती अगोदरच दिल्याने वाहनधारकांची मोठी अडचण झाली नाही. दुरुस्तीमुळे वाहतूक पाचवड कुडाळ पाचगणी व नागेवाडी (ता वाई)मार्गाने पसरणी घाट अशी वळविण्यात आली होती. घाट दुरुस्तीमुळे वाई येथे घाट रस्त्यावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.