सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्टपर्यंत बंद

तिकीट दरात 25 रुपये वाढ


दैनिक स्थैर्य । 19 जून 2025 । सातारा। रस्ता व पुलाचे काम सुरू असल्यामुळे वाई- सुरूर रस्त्यावरील सुरूरकडून वाईकडे जाणारी वाहतूक 15 ऑगस्टपर्यंत बंद करण्यात आली आहे. प्रवाशांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांनी केले आहे.

याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटल्यानुसार, सुरूर ते वाई राज्यमार्गावरील रस्त्याचे व पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे वाहतुकीस, तसेच रस्त्याचे काम करण्यास अडथळा निर्माण होत आहे.वाई- सुरूर या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू झाल्याने वाईकडून राष्ट्रीय महामार्गावर जाणार्‍या व वाईकडे येणार्‍या सर्व एसटी बस पाचवडमार्गे जाणार आहेत. हे अंतर वाढल्याने एसटी प्रशासनाने तिकीट दरात 25 रुपये वाढ केली आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत सर्व प्रकारची एसटी वाहतूक पाचवडमार्गे होणार असल्याची माहिती वाईचे आगार व्यवस्थापक युवराज कदम यांनी दिली.त्यामुळे 18 जून ते 15 ऑगस्ट या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई- पुणे बाजूकडून येणार्‍या वाहनांनी सुरूरमार्गे न जाता पाचवडमार्गे वाईकडे जायचे आहे. महाबळेश्वरवरून पुणे व मुंबईकडे जाणार्‍या वाहनांसाठी वाई ते सुरूर रस्ता हा एकेरी वाहतुकीसाठी खुलाराहणार आहे.

वाईकडून सातार्‍याकडे जाणार्‍या वाहनांनी पाचवडमार्गेच सातार्‍याकडे जायचे आहे. वाहतूक वळविलेल्या ठिकाणी पोलिस दलाकडून दिशादर्शक फलक व बंदोबस्तही तैनात करण्यात येणार आहे. वाहतुकीतील या बदलाचे पालन करून वाहनधारकांनी सहकार्य करावे, असे आवाहन अधीक्षक दोशी यांनी केले आहे.


Back to top button
Don`t copy text!