स्थैर्य, बिजवडी, दि. 15 : ग्रामीण भागात पावसाळ्यात, थंडीच्या दिवसांत ब्लँकेट, रग, चादरी यांना मागणी वाढते. घोंगडीमुळे पावसा ळ्यात पावसाच्या पाण्यापासून निर्माण होणार्या थंडीपासून ऊब मिळत असे, मात्र खात्रीने ऊब देणारी घोंगडी आता दुर्मीळ होत चालली असल्याने ग्रामीण भागात घोंगडीची ऊब दुर्मीळ होत आहे. घोंगडी बनविण्याचा व्यवसाय आर्थिक कारणास्तव अडचणीत आल्याचे या क्षेत्रातील व्यावसायिक व मेंढपाळ सांगत आहेत.
घोंगडी बनविण्याचा व्यवसाय विशेषत: सणगर समाजातील लोक करतात. हातमाग (वीणकाम) करून घोंगडी बनवण्याचा व्यवसाय दुर्मीळ झाला आहे. घोंगडीची बाजारपेठेत मागणी कमी झाली आहे. ज्यांच्याकडे मेंढ्या आहेत त्यांना लोकर (मेंढ्यांचे केस) विकत घेण्याची गरज पडत नाही. एक घोंगडी बनवण्यासाठी चार ते पाच किलो लोकर लागते.
लोकर कातून वीणकाम केले जाते. त्यानंतर चिंचोक्याची खळ लावून घोंगडी बनविली जाते. बाजारपेठेत एका घोंगडीला सरासरी 700 ते 1 हजार रुपयापर्यंत किंमत मिळते. एक घोंगडी बनविण्यासाठी किमान एक दिवसाचा अवधी लागतो. या एका घोंगडीमागे साधारणत: दोनशे ते तीनशे रुपयांचे उत्पन्न या व्यावसायिकांना मिळते, असे यातील जाणकारांनी सांगितले.
ग्रामीण भागात काळ्या (देशी) मेंढ्याना लांब आणि मुलायम रेशमासारखी लोकर मिळते. आज संकरित व माडग्याळ जातीच्या देखण्या मेंढ्या पाळण्याकडे मेंढपाळ व्यावसायिक वळलेले असल्याने लोकर मिळेनाशी झाली आहे. माडग्याळ (पांढर्या) मेंढ्याची लोकर खुरटी, चरबट व ताठ असल्याने ती बिनकामी ठरत आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे, साथीच्या आजाराने व जमिनीचे तुकडीकरण झाल्याने मेंढपाळ व्यवसाय संकटात सापडल्याने घोंगडी बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल लोकर मिळत नसल्याने हातमाग कामाद्वारे घोंगडी बनवण्याचा व्यवसाय कमी झाला आहे. आजही घोंगडीला विशेष महत्त्व आहे. घोंगडीचा वापर, बिरोबा, खंडोबाची तळी उचलण्यासाठी व धार्मिक कामासाठी केला जातो.
आता ग्रामीण भागातही घोंगडीचा वापर कमी झाल्याचे दिसत आहे. घोंगडीचा वापर केल्यास कंबरदुखी, पाठदुखी कमी होते, असा दावाही केला जातो.