व्यापार्‍यांनी संयम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे : प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. ८ जुलै २०२१ । फलटण। कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर व्यापार्‍यांनी आजवर प्रशासनाला सहकार्य केले आहे त्याचपद्धतीने इथून पुढेही संयम पाळावा. सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याशी आपण लवकरच चर्चा करुन व्यापार्‍यांच्या प्रश्‍नांवर तोडगा काढण्याचा निश्‍चितपणे प्रयत्न करु व दोन दिवसात आपला निर्णय कळवू; असे आश्‍वासन फलटण प्रांताधिकारी डॉ.शिवाजीराव जगताप यांनी फलटणमधील व्यापार्‍यांना दिले.

फलटण तालुका व्यापारी महासंघ, फलटण तालुका व्यापारी वेलफेअर असोसिएशन, फलटण व्यापारी संघटना व फलटण शहरातील सर्व छोटे मोठे व्यावसायिक व दुकानदार यांच्यावतीने लॉकडाऊनचे निर्बंध मागे घेऊन दुकाने सुरु करण्यास परवानगी देण्याबाबत डॉ.शिवाजीराव जगताप यांना निवेदन दिले. त्यावेळी व्यापार्‍यांना आश्‍वस्त करताना डॉ.शिवाजीराव जगताप बोलत होते. यावेळी तहसीलदार समीर यादव, फलटण नगरपालिकेचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, फलटण शहर पोलीस निरीक्षक भारत किंद्रे उपस्थित होते.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, लॉकडाऊनमुळे फलटण शहरातील बाजारपेठ अधिककाळ बंद राहिल्याने व्यापारी, छोटे व्यावसायिक, हातगाडीवाले, वडापाव वगैरे तत्सम खाद्यपदार्थ विक्रेते यांच्यासह नोकरदार, शिक्षा, माल वाहतुकीचे वाहनदारधक आदी घटकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून यामुळे जनरल व्यापार्‍यांची कुचंबना होत आहे.

सद्यस्थितीत फलटण शहरात कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झालेला असून दुकानदारांकडे येणार्‍या ग्राहकांची संख्याही कमी प्रमाणात आहे. मात्र अत्यावश्यक वस्तूंबरोबर मद्य विक्रीसारख्या व्यवसायांना प्राधान्य देवून शासनाने इतर व्यवसायांवर अन्याय केला आहे. शासनाच्या सर्व नियमांचे आम्ही काटेकोर पालन करु. तरी प्रशासनाने लॉकडाऊनचा सध्याचा निर्णय बदलून दुकाने सुरु करण्यास आम्हाला परवानगी द्यावी. तसेच कोरोना प्रार्दुभाव टाळण्यासाठी व्यापार्‍यांना लस उपलब्ध करुन द्यावी, अशी मागणी व्यापार्‍यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान, आम्हाला गुरुवारपर्यंत निर्णय कळवा अन्यथा आम्ही शुक्रवारपासून नियमित दुकाने सुरु करु; असा पवित्रा व्यापार्‍यांनी यावेळी घेतला होता. मात्र प्रांताधिकार्‍यांच्या आवाहनानंतर व्यापार्‍यांनी प्रशासनाच्या निर्णयाची प्रतिक्षा करण्याचे निश्‍चित केले आहे.

यावेळी यावेळी वसीम आमीरभाई मणेर, मंगेश दोशी, राजेश हेंद्रे, दिगंबर कुमठेकर, निजाजभाई आतार, जाकिर भाई मनेर, हिनाकौसर वसीम मनेर व इतर प्रमुख व्यापारी उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!