दैनिक स्थैर्य | दि. 01 जानेवारी 2022 | फलटण | फलटण शहरामध्ये सध्या नगरपरिषद व महसूल विभागाच्या माध्यमातून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. याच्या विरोधात फलटण तालुक्यातील शेकडो व्यापारी एकत्र येऊन आज फलटण मध्ये शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी फलटण बंद साठी उस्फूर्त असा प्रतिसाद देत फलटण बंद ठेवलेले आहे. आता ही लढाई आपण 50% जिंकली असून उद्या सर्व व्यापाऱ्यांसहित आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन अतिक्रमण हटाव मोहिमेला स्थगिती मिळेपर्यंत ही लढाई आपण सुरू ठेवणार आहोत, अशी माहिती फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम यांनी दिली.
अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष नरसिंह निकम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून फलटण बंदची हाक देण्यात आलेली होती. त्यानुसार फलटण शहरामधून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला. मोर्चा समाप्तीच्या वेळेस फलटण तालुका संघर्ष समितीचे अध्यक्ष ॲड. नरसिंह निकम बोलत होते. यावेळी विविध संघटनांचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ॲड. नरसिंह निकम म्हणाले की, फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून बेकायदेशीरपणे जी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. ती अतिक्रमण हटाव मोहीम जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून स्थगित करण्यासाठी आपण सर्व व्यापाऱ्यांच्या वतीने उद्या सोमवार दि. 02 जानेवारी रोजी सातारा येथे जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहोत. त्यांची भेट घेऊन ही मोहीम स्थगित करण्यासाठी त्यांचे लेखी आदेश घेणार आहोत. जर गरज पडली तर पालकमंत्री महोदयांची सुद्धा भेट घेऊन हा प्रश्न त्यांच्या समोर मांडणार आहोत.
उद्या सोमवार दि. 02 जानेवारी रोजी सर्व व्यापारी बांधवांना सातारा येथे घेऊन जाण्यासाठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून सोय करण्यात येणार आहे. त्याबाबत असलेल्या सूचना व्यापारी असोसिएशनच्या वतीने देण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष वसीम मणेर यांनी दिली.