दैनिक स्थैर्य | दि. ३० सप्टेंबर २०२३ | फलटण |
फलटणमध्ये तीन-चार दिवसांपूर्वी जी व्यापार्यांना दिवसाढवळ्या शस्त्रांचा धाक दाखवून लुटण्याचा प्रकार घडला व खंडणी मागितली गेली, याचा घटनेचा आम्ही निषेध करतो. यापूर्वी फलटणमध्ये अशा घटना घडत नव्हत्या; परंतु अलीकडच्या काळात या घटना घडू लागल्या आहेत. मात्र, नेहमी शांत असणार्या फलटण शहराला या घटनेमुळे गालबोट लागले आहे. यापुढे अशा घटना घडू नये, अशा सूचना आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाला करतोच आहे. व्यापार्यांनी घाबरू नये. पोलीस प्रशासनाने दोषींवर कारवाई केली आहे, त्यांना अधिकाधिक कडक शिक्षा कशी होईल, याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे आ. दीपक चव्हाण आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यापार्यांना सांगितले.
फलटण शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या व्यापार्यांना लुटण्याच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ. दीपक चव्हाण व श्रीमंत संजीवराजे म्हणाले की, फलटणला आज व्यापाराच्या द़ृष्टीने महत्त्व आले आहे. येथील व्यापार भरभराटीस येऊ लागला आहे. धोम-बलकवडी, भाटघर धरणांमुळे येथील जीवन समृद्ध झाले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी घडलेल्या शहरातील दहशत माजवून व्यापार्यांना लुटण्याच्या घटनेने या शहराची शांतता बाधित होत आहे. असले प्रकार पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलीस कारवाई करत आहेत. आम्हीही येथील व्यापार्यांच्या, जनतेच्या पाठीशी असून अशा प्रवृत्तींचा कायमचा बंदोबस्त करण्याचा आमचा प्रयत्न राहणार आहे. त्यामुळे व्यापार्यांनी घाबरून न जाता आपल्या व्यवसायात लक्ष घालावे, असे आवाहन त्यांनी केले.