
स्थैर्य, पाचगणी, दि. २४ : सावकारांच्या तगाद्याला कंटाळून आणि फायनान्स कंपनीने फसवल्याने पाचगणी येथील प्रशांत शिंदे या व्यापाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडल्याने पाचगणीत खळबळ उडाली आहे.
याबाबत पाचगणी पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की रोहन प्रशांत शिंदे (वय 24, रा. वसंत जाम सेंटर मेन रोड पाचगणी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांचे वडील प्रशांत जयवंत शिंदे यांनी आदित्य रमेश पारठे (वय 27 रा.महाबळेश्वर) यांच्याकडून एक लाख रुपये, शंकर महादेव कांबळे (वय 27, रा. पाचगणी) यांच्याकडून 40 हजार रुपये, प्रकाश गोळे (रा. पाचगणी) यांच्याकडून 60 हजार रुपये आणि दीपक कुंदा (रा. मुंबई) यांच्याकडून 50 हजार रुपये अशी रक्कम व्याजाने घेतली होती.
या पैशांसाठी व व्याजासाठी चारही सावकार त्यांना वेळोवेळी फोनवरून तसेच प्रत्यक्ष भेटून त्रास देत होते. म्हणून प्रशांत शिंदे यांनी आदर्श फायनान्स कंपनीच्या जाहिरातीनुसार संपर्क साधला. अमोल पाटील व रोहन काळे अशी नावे सांगणाऱ्या व्यक्तींनी त्यांना 2 टक्के व्याजदराने कर्ज प्रकरण मंजूर करुन कर्जाची रक्कम देण्याकरीता त्यांनी दिलेल्या अकाऊंटवर वेळोवेळी दोन लाख 33 हजार 490 रुपये भरले व या कंपनीने त्यांचे कोणतेही कर्ज मंजूर न करता त्यांची फसवणूक केली.
त्यामुळे सावकारांच्या तगाद्याला कंटाळून व आदर्श फायनान्सने केलेल्या फसवणुकीमुळे प्रशांत शिंदे यांनी विषारी औषध केले. त्यात ते मरण पावले. पोलिसांनी आदित्य पार्टे, शंकर कांबळे, प्रकाश गोळे, दीपक कुंदा, अमोल पाटील, रोहन काळे यांचे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.