दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२२ । बारामती । कामगार व त्यांच्या न्याय, हिताचे संरक्षण होणेसाठी या पुढे प्रत्येक औद्योगिक क्षेत्रातील छोट्या मोठ्या कंपनीत राष्ट्रवादी कामगार सेलच्या माध्यमातून कामगार संघटना व फेडरेशन ची स्थापना करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा राष्ट्रवादी कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे यांनी केली.
कामगार मंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये औद्योगिक क्षेत्रातील संघटित असंघटीत, कंत्राटी कामगारांच्या प्रतिनिधी यांची बैठक संपन्न झाली. यावेळी शिवाजीराव खटकाळे बोलत होते. यावेळी बारामती एमआयडीसी मधील श्रायबर डायनॅमिक्स डेअरी कर्मचारी संघटनांचे अध्यक्ष नानासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महासचिव शिवाजीराव गर्जे, कामगार सेलचे सचिव सोमनाथ शिंदे, उपाध्यक्ष निवृत्ती देसाई, विलास घुले – पाटील, विजय काळोखे, योगेश जाधव, पिंपरी चिंचवड अध्यक्ष किरण देशमुख, बारामती एमआयडीसी परिसरातील राष्ट्रवादी कामगार सेलचे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते.
कामगाराच्या हितासाठी राष्ट्रवादी कामगार सेल कटिबद्ध असून कायद्याच्या चौकटीत बसून या पुढील काळात कंपनी ते संघटना किंवा फेडरेशनची स्थापना करून वंचित कामगारांना मुख्य प्रवाहात सामील करून घेतले जाणार असल्याचे शिवाजीराव खटकाळे यांनी यावेळी स्पष्ट केले.
या वेळी बारामती, पणदरे, कुरकुंभ, वालचंदनगर, फलटण, इंदापूर आदी परिसरातील सर्व उद्योग व या परिसरात राष्ट्रवादी कामगार सेलने कामगारांसाठी केलेले नाविन्यपूर्ण उपक्रम व कामगारांसाठी शासनाच्या योजना तळागाळात पोचविण्यासाठी केलेले कार्य या बदल श्रायबर डायनॅमिक्स डेअरी युनियनचे अध्यक्ष नानासाहेब थोरात यांनी मान्यवरांना माहिती दिली. राज्यातील प्रतिनिधी यांनी कामगार श्रेत्रातील विविध घडामोडी बदल मते व्यक्त केली.