
स्थैर्य, कराड, दि. २५ : गणेश मूर्ती विसर्जित करण्यासाठी कोयना व कृष्णा नदी काठावर कोणालाच येवू न देण्याचा निर्णय कराड नगरपालिकेने घेतला आहे. पोलिसांनी तशी बंदी घातली आहे. त्यामुळे गल्लोगल्ली जावून घरगुती व सार्वजनिक गणेशमूर्ती संकलनासाठी पालिकेने प्रत्येक वॉर्डमध्ये ट्रॅक्टरची सोय केली आहे. मूर्ती संकलन करून त्या मूर्तीची पूजा करून विधिवत विसर्जन पालिकेचे कर्मचारी करत आहेत. रविवारपासून दीड दिवसाच्या गणेशमूर्ती पालिकेने जमा करून त्या विधिवत विसर्जित केल्या. त्यासाठी पालिकेने 8 मोठी वाहने शहरात ठेवली होती. प्रत्येक वाहनासोबत पाच कर्मचारी नेमले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गणेश मूर्ती विसर्जनासाठी बाहेर पडू नये यासाठी कराड नगरपालिकेने गणेश विसर्जनासाठी पालिका आपल्या दारी हा उपक्रम राबवला आहे. त्याद्वारे पालिकेचा ट्रॅक्टर मूर्ती संकलन करत आहे. पोलिसांनीही गणेश मूर्ती विसर्जनाला होणारी गर्दी लक्षात घेऊन यंदा काही कठोर निर्णय घेतले आहेत. त्यामुळे मूर्ती विसर्जित करण्यासाठी नदीकाठावर कोणालाच येऊ देण्यात येणार नाही. मूर्ती विसर्जन होणार्या ठिकाणी पोलिसांनी बॅरिकेट्स लावून रस्ते बंद केले आहेत.
रविवारी दीड दिवसाच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठीही तो नियम लागू होता. घरीच मूर्ती विसर्जित करा किंवा पालिकेच्या मूर्ती संकलन वाहनात पालिकेकडे मूर्ती द्या, असा नियम लागू केला होता. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला. मूर्ती संकलनासाठी पालिकेने मोठी 8 वाहने व त्या प्रत्येक वाहनासोबत किमान 5 कर्मचारी मूर्ती संकलन करत होते. गल्लोगल्ली जावून मूर्ती संकलनाचे काम सुरू होते. काहींनी पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात गणेशमूर्ती घरीच विसर्जित केल्या.
उत्सवाच्या पुढच्या काळातही मूर्ती संकलनासाठी पालिकेची वाहने कार्यरत राहतील. त्यासाठी पालिकेने 28 वाहने, पालिकेचे तब्बल 150 कर्मचारी, नदीपात्रात 3 बोटी तयार ठेवल्या आहेत. त्याशिवाय शहरातील 19 वेगवेगळ्या ठिकाणी कृत्रिम जलकुंडही उभारले आहेत. ज्या गणेशभक्तांना घरीच मूर्ती विसर्जन करणे शक्य आहे. त्यांनी घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे तसेच ज्यांना घरी मूर्ती विसर्जन करता येणार नाही, अशा नागरिकांसाठी प्रत्येक वॉर्डमध्ये पालिकेने ट्रॅक्टरची सोय केली आहे. या ट्रॅक्टरमधून मूर्ती संकलन करून शहरातील जलकुंभामध्ये त्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचेही याच ट्रॅक्टरमध्ये संकलन करण्यात येणार आहे. शहरात पालिकेने एकूण 18 जलकुंभ उभारण्यात आले आहेत. यासाठी दि. 23, 26, 27, 29, 30 व 1 सप्टेंबर रोजी प्रत्येक वॉर्डमध्ये ट्रॅक्टर फिरवण्यात येणार आहे. पालिकेने 2 मोठी शेततळी उभारली आहेत. तेथे मूर्ती विसर्जित केल्या जाणार आहेत.
शहरात प्रत्येक वॉर्डमध्ये मूर्ती संकलन करण्यात येणारे ट्रॅक्टर हे सजावट केलेले आहेत. विविध रंगांचे फुगे व फुलांनी ट्रॅक्टरची सजावट करण्यात आली आहे. नागरिकांना ट्रॅक्टर त्यांच्या पेठेमध्ये आल्याची माहिती कळण्याकरिता प्रत्येक पेठेमध्ये घोषणा करण्यात येणार आहे. ‘गणेशमूर्ती विसर्जनासाठी नगरपालिका आपल्या दारी हा उपक्रम राबवण्यात आला असून याचे उद्घाटन मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्या हस्ते करण्यात आले.