दैनिक स्थैर्य । दि. २७ मे २०२२ । फलटण । दुग्ध व्यवसायात गुणवत्ता आणि शाश्वततावाढीच्या उद्देशाने महाराष्ट्रातील डेअरी फार्मिंगमध्ये ट्रेसेबिलीटी तंत्रज्ञानाचा शुभारंभ सॉलिडारिडाड संस्थाने न्यूट्रेको, गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट प्रा.लि;, आणि अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामती यांच्या सहकार्याने करण्यात आला आहे. दुग्धव्यवसायात हे तंत्रज्ञान आणणे अतिशय कठीण असताना उत्पादक आणि प्रोसेसर यांनी स्वीकारलेल्या शाश्वत आणि गुणात्मक पद्धतीमुळे म्हणजेच ट्रेसेबिलीटी तंत्रज्ञानामुळे दुग्धव्यवसायात दृश्यमानता आणि पारदर्शकता वाढणार आहे. क्युआर कोडच्या स्कॅनिंगद्वारे ग्राहकांना ही पारदशर्कता पाहता येणार आहे, अशी माहिती गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस् प्रा.लि; च्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
ट्रेसेबिलीटी तंत्रज्ञानाच्या शुभारंभाप्रसंगी गोविंद मिल्क अँड मिल्क प्रोडक्टस प्रा.लि; चे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संचालक श्रीमंत सत्यजीतराजे नाईक निंबाळकर, महाव्यवस्थापक डॉ.शांताराम गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी धर्मेंद्र भल्ला, भारत आणि श्रीलंकेचे कृषी सल्लागार मिशीयल व्हॅन एर्केल, दुग्ध व पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त धनंजय परकाळे, सॉलिडारिडाड इंडियाच्या कंट्री मॅनेजर सुश्री मोनिका खन्ना, ट्राउ न्यूट्रिशन इंडियाचे आरएमटी एशिया पॅसिफिक डॉ.सुयश वर्धन, अॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या सेंटर ऑफ एक्सलन्स डेअरीचे प्रमुख डॉ.धनंजय भोईटे, सॉलिडारिडाड आशियाचे मोहम्मद दिलशाद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी दुग्धजन्य पशूंची उत्पादकता वाढवणे, ट्रेसिबीलीटी, भारतातील शाश्वत डेअरी फार्मची गरज आणि समर्पकता आदी शाश्वत डेअरी फार्मिंगच्या विविध विषयांवर मार्गदर्शन केले.