
आधी पार्किंगचे पट्टे ओढणार, मगच कारवाईचा बडगा; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे प्रशासनाला निर्देश.
स्थैर्य, फलटण, दि. ३१ डिसेंबर : फलटण शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी आणि बेशिस्त पार्किंगला चाप लावण्यासाठी नगरपरिषदेने आता कठोर पाऊल उचलले आहे. शहरात लवकरच ‘टोईंग व्हॅन’ (Towing Van) सेवा सुरू करण्यात येणार आहे. मात्र, “नागरिकांवर कारवाई करण्यापूर्वी त्यांना पार्किंगसाठी योग्य जागा आणि शिस्तबद्द पट्टे (Parking Lines) आखून द्या, त्यानंतरच टोईंग व्हॅन सुरू करा,” असे स्पष्ट निर्देश नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.
संयुक्त विद्यमाने होणार कारवाई
फलटण नगरपरिषद, फलटण शहर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय परिवहन कार्यालय (RTO) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम राबवण्यात येणार आहे. याबाबत नियोजनासाठी नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी आपल्या दालनात विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्याधिकारी निखिल जाधव, आरटीओ अधिकारी श्री. लेंभे आणि नगरसेवक रोहित नागटिळे प्रामुख्याने उपस्थित होते.
आधी सोय, मग कारवाई
टोईंग व्हॅन सुरू करण्यापूर्वी प्रशासनाने काय तयारी करावी, याबाबत नगराध्यक्षांनी स्पष्ट रोडमॅप दिला आहे:
१. पार्किंग झोन: शहरात रस्त्यांवर पार्किंगसाठी मुबलक जागा उपलब्ध करून देण्यात येईल.
२. पट्टे ओढणे: रस्त्यांवर पार्किंगसाठी पांढरे पट्टे ओढून जागा निश्चित केली जाईल.
३. जनजागृती: नागरिकांना पार्किंगच्या शिस्तीबाबत आवाहन करण्यात येईल.
४. कारवाई: वरील सर्व बाबींची पूर्तता झाल्यानंतरच शहरात टोईंग व्हॅन फिरवण्यात येईल आणि बेशिस्त वाहनांवर कारवाई केली जाईल.
शहरातील बाजारपेठ आणि मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. प्रशासनाने यावर तत्काळ कार्यवाही करावी, अशा सूचना समशेरसिंह यांनी दिल्या आहेत.

