
सातारा – नौका विहाराचा आनंद लुटताना श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले व इतर.
स्थैर्य, सातारा, दि.27 ऑक्टोबर : कास तलाव हा ऐतिहासिक तलाव आहे. येथे सातारा पालिकेने ’कास बोटिंग क्लब’च्या माध्यमातून पर्यटकांसाठी बोटिंग करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. पर्यटकांनी बोटिंगचा मनमुराद आनंद लुटावा, असे आवाहन करतानाच सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी कास तलावाचे सौंदर्य अबाधित राहण्यासाठी सहकार्य करावे, असे स्पष्ट केले.
सातारा पालिकेने कास तलावात – बोटिंगची सुविधा आजपासून उपलब्ध केली. त्याचा प्रारंभ मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी अविनाश कदम, अभय फडतरे यांच्यासह पालिकेचे आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक उपस्थित होते.
मंत्री शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, कास तलावात बोटिंगची सुविधासुरू झाल्याने येथे पर्यटकांची संख्या निश्चित वाढेल. या तलावाचे पाणी सातारकर पितात. त्यामुळे तलावात प्रदूषण होऊ नये, यासाठी पालिकेने बोट क्लब व्यवस्थापनाला नियम अटी घालून दिल्या आहेत. त्याचे पालन व्यवस्थापनाने काटेकोरपणे करावे.येथील स्थानिकांना देखील रोजगाराची, व्यवसायाची उपलब्धता होणार आहे. स्थानिकांना व्यवस्थापनाने प्राधान्य द्यावे, स्थानिकांनी चांगल्या गोष्टींना विरोध करू नये. सर्वांनी मिळून पर्यटकांना सोयी सुविधा द्या, असे आवाहन मंत्री भोसले यांनी केले.

