
कास – पठारावर पर्यटकांची गर्दी झाल्यामुळे परिसरात वाहनांच्या अशा रांगा लागल्या होत्या. (छायाचित्र – अतुल देशपांडे, सातारा)
स्थैर्य, सातारा, दि.27 ऑक्टोबर : जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम अंतिम टप्प्यात असून सध्या पठारावर पर्यटकांची तोबा गर्दी होत आहे. त्यातच सातारा शहराच्या पश्चिमेला असणार्या सज्जनगड, ठोसेघर, भांबवली वजराई धबधबा, बामणोली बोटिंग, मुनावळे बोटिंग या पर्यटनस्थळीही गर्दीचा माहोल आहे.
सातारा सध्या सर्वत्र दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने पर्यटकांनी जिल्ह्यातील विविध पर्यटन स्थळी फिरण्यासाठी नियोजन केले आहे. कास पुष्प पठारावरील फुलांचा हंगाम हा सद्यस्थितीत अंतिम टप्प्यात असून पठारावर सध्या चवर, मिकी माऊस, कुमुदिनी या फुलांचा बहर ओसरायला सुरुवात झाली आहे. हीच फुले पाहण्यासाठी पर्यटकांनी कास पठारावर तोबा गर्दी केली होती. दोन्ही पार्किंग स्थळे व बससेवा बंद करण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन तिकीट न देता ऑफलाईन तिकीट सुरू आहे. सध्या पठारावर जी फुले आहेत त्यांचीच माहिती देऊन नंतर पर्यटकांना तिकीट देऊन आत प्रवेश दिला जात आहे. सुरुवातीच्या काळात जसा फुलांचा बहर होता तसा बहर बघायला जरी मिळत नसला तरी जी फुले आहेत ती पाहून पर्यटक आनंदून जात आहेत. सर्व माहिती दिल्याने पर्यटक वाद देखील घालत नाहीत. अचानक कासपठारावर गर्दी वाढल्याने पठारावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या पहावयास मिळत होत्या. त्यात मधूनच पावसाने शिडकावा केल्याने पर्यटकांना सुखद गारवा अनुभवायला मिळाला. अजून आठवडाभर कास पठारावर पर्यटकांची मोठी गर्दी होण्याचा अंदाज पठारावरील कार्यरत कर्मचार्यांकडून वर्तवण्यात येत आहे.

