स्थैर्य, सातारा, दि. २० : कोविड जागतिक महामारीमुळे स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णतः ठप्प आहे. पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे अशा सर्व घटकांना बसणार्या कोरोनाच्या झळा अतितीव्र स्वरुपाच्या आहेत. जीडीपीमध्ये मोलाचे योगदान देणार्या पर्यटन क्षेत्रात टूर्स ऑपरेटर, ट्रॅव्हल एजंट, विमान सेवा यांखेरीज इतर अनेक छोटे-मोठे घटक समाविष्ट आहेत. पण गेल्या सहा महिन्यांपासून एक रुपयांचीही उलाढाल न झाल्याने आणि पुढील काही महिने स्थिती सुधारण्याची शक्यता नसल्याने या क्षेत्रावर उदरनिर्वाह करणार्यांपुढे जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पर्यटन हा अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. पर्यटनामुळे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत असते. विदेशी पर्यटक आपल्या देशात आले तर त्याद्वारे अर्थव्यवस्थेला आणखी बळकटी मिळते. याचे कारण विदेशी पर्यटक विदेशी चलन आणत असतात. त्यामुळे पर्यटनाचे नाते अर्थव्यवस्थेशी जोडले गेले आहे. पर्यटनाचे क्षेत्र अर्थव्यवस्थेसाठीच उपकारक ठरणारे नसून पर्यटनामुळे जगभरातील संस्कृतींची ओळख आणि देवाणघेवाण होत असते; तसेच निसर्गाच्या सौंदर्याविष्कारांचा आनंद उपभोगण्याची संधी मिळत असते. पर्यटनाच्या निमित्ताने दूरस्थ लोकांशी परिचय होत असतात. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये नेहमीच पर्यटन क्षेत्राने मोलाचे योगदान दिले आहे. केवळ भारतच नव्हे तर आज जगभरातील अनेक देश केवळ पर्यटन व्यवसायावर अवलंबून आहेत. जगाच्या जीडीपीमध्ये पर्यटनक्षेत्राचा हिस्सा 10 टक्के इतका असून 33 कोटींहून अधिक नोकर्या या क्षेत्रातून निर्माण झालेल्या आहेत. गेल्या पाच वर्षांत जगभरात चारपैकी एक नोकरी या क्षेत्रातून निर्माण झाली आहे. कोरोनाच्या संकटकाळापूर्वी हे क्षेत्र 3.5 टक्के दराने वृद्धी करत होते. वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम कौन्सिल (डब्ल्यूटीटीसी)च्या म्हणण्यानुसार मेक्सिकोसारख्या देशाला कोरोनाचा मोठा फटका बसला आहे कारण त्यांच्या जीडीपीमध्ये 15.5 टक्के हिस्सा पर्यटनक्षेत्राचा आहे. भारताचा विचार करता आपल्या एकूण अर्थव्यवस्थेत पर्यटनक्षेत्राचा वाटा 6.8 टक्के इतका आहे.2019 मध्ये पर्यटनक्षेत्रातून 4.2 कोटी नोकर्यांची निर्मिती झाली. देशात झालेल्या एकूण रोजगारनिर्मितीच्या तुलनेत हा हिस्सा 8.1 टक्के इतका आहे. भारतात येणार्या विदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे. डब्ल्यूटीटीसीच्या अहवालानुसार, भारतात 12 टक्के लोक बांगलादेशातून, 9 टक्के अमेरिकेतून, 6 टक्के ब्रिटेनमधून, 2 टक्के ऑस्ट्रेलियातून, 2 टक्के कॅनडातून आणि 69 टक्के लोक अन्य देशांमधून पर्यटनासाठी येतात. या अहवालानुसार, भारतात ट्रॅव्हल आणि टुरीझम क्षेत्रातील 83 टक्के खर्च हा देशांतर्गत होतो; तर 17 टक्के खर्च आंतरराष्ट्रीय स्तरावर होतो.
औद्येागिक संस्था सीआआय आणि हॉटेलिवेट या संस्थेने अलीकडेच केलेल्या एका अभ्यासानुसार, कोविड19 च्या संकटामुळे भारतात पर्यटन व्यवसाय आणि त्याची पुरवठा साखळी यांचे अभूतपूर्व नुकसान झाले आहे. स्थानिक, आंतरराराज्यीय, आंतरदेशीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व प्रकारचा पर्यटनव्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून पूर्णतः ठप्प आहे. पर्यटनक्षेत्रातील क्रूज, कॉपोर्रेट, साहसी पर्यटन, वारसास्थळे अशा सर्व घटकांना बसणार्या कोरोनाच्या झळा अतितीव्र स्वरुपाच्या आहेत. आकड्यांमध्ये विचार करता, तब्बल 5 लाख कोटी म्हणजे 65.57 अब्ज डॉलर्सचा फटका या क्षेत्राला बसला आहे. यामध्ये संघटित क्षेत्राचे झालेले नुकसान 25 अब्ज डॉलर्स इतके असण्याची शक्यता आहे. फेडरेशन ऑफ असोसिएशन इन इंडियन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी (एफएआयटीएच) च्या मते हे नुकसान 15 लाख कोटींहून अधिक आहे. संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव एंतोनियो गुतारेस यांनीही गेल्या महिन्यामध्ये पर्यटनक्षेत्राच्या नुकसानीबाबत चिंता व्यक्त केली होती. गेल्या पाच महिन्यांत वैश्विक पर्यटनउद्योगाचे 320 अब्ज डॉलसर्च नुकसान झाले असून 12 कोटी नोकर्या धोक्यात आल्या असल्याचे त्यांनी म्हटले होते.
23 मार्चपासून देशात टाळेबंदी सुरु झाली आणि देशांतर्गत तसेच विदेशी प्रवासासह सारे काही ठप्प झाले. अर्थव्यवस्थेची चाके पुन्हा गतिमान झाल्याशिवाय लोकांना जगवता येणार नाही हे लक्षात येताच कोरोना संक्रमणाच्या धोक्यात तसूभरही फरक पडलेला नसतानाही अनलॉक आणि न्यू नॉर्मलची प्रक्रिया सुरु झाली. टप्प्याटप्प्याने सारे काही खुले होत गेले. परंतु पर्यटनक्षेत्रासाठीचे, हॉटेल इंडस्ट्रीसाठीचे निर्बंध मात्र तसेच कायम राहिले. आजही आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद आहे. वंदे भारत योजनेंतर्गत परदेशातील अनेक भारतीयांना मायदेशी आणण्यात येत आहे; पण यासाठी केवळ एअर इंडियाचाच वापर करण्यात येत आहे. खासगी विमान कंपन्यांना त्यामध्ये सहभागी करुन घेतले जात नाहीये. आज भारताच्या इमिग्रेशनच्या नियमावलीनुसार अमेरिकेच्या स्टुडंट व्हिसावर युनायटेड एअर लाईन्स, टर्किश एअरलाईन्स यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रवास करता येत नाही; पण तेच विद्यार्थी वंदे भारतअंतर्गत प्रवास करु शकतात. असाच प्रकार सर्वसाधारण नागरिकांबाबतही दिसून येतो. हा दुजाभाव खासगी विमानसेवांसाठी आणि परदेशात जाऊ इच्छिणार्या प्रवाशांसाठी मारक ठरत आहे. एअर इंडियाचा लाभ होणार असेल तर त्यात गैर काहीच नाही; परंतु खासगी विमान वाहतुकीला ब्रेक लावल्यामुळे ट्रॅव्हल इंडस्ट्रीची चाके पुढे सरकण्यात अडथळे येत आहेत. वास्तविक, वंदे भारत अंतर्गत प्रवाशांना मोजावे लागणारे पैसे हे खासगी विमानसेवेपेक्षा खूप अधिक आहेत. त्यामुळे नागरिकांनाही आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे लवकरात लवकर सर्व विमानसेवा सुरु होणे आवश्यक आहे.
हॉटेल्स बंद आहेत. कोरोना संक्रमणाने बाधितांचा आकडा दिवसागणिक वाढत चालल्याने पर्यटनाला सुरुवात होऊन ते सुरळित होण्यास 2021 चा पूर्वार्धही उलटू शकतो. अशा स्थितीत या व्यवसायावर अवलंबून असणार्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
पर्यटन व्यवसायाचा आवाका प्रचंड मोठा आहे. केवळ वाहतूक, हॉटेल इंडस्ट्री आणि टुरिझम कंपन्या, टूर्स ऑपरेटर म्हणजे पर्यटनउद्योग नव्हे; तर त्यावर अवलंबून असणार्या अन्य पूरक घटकांची संख्या कितीतरी पटींनी अधिक असते. पर्यटक विविध पर्यटन स्थळांना भेटी देत असतो त्यावेळी त्याद्वारे त्या भागातील स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत असतात. ज्यांनी 25-30 वर्षापूर्वीचे कोकण पाहिले आणि आजचे कोकण पाहिले आहे त्यांना पर्यटनामुळे कोकणात झालेला बदल निश्चितपणे अनुभवास येईल. पर्यटनामुळे कोकणासारख्या भागाचा चेहरामोहरा बदलण्यास मदत झाली आहे. एकेकाळी मुंबईतील कोकणवासियांच्या मनीऑर्डरवर अवलंबून असलेला प्रदेश म्हणून कोकणची ख्याती होती; मात्र पर्यटनामुळे कोकणात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या. असे चित्र देशाच्या अनेक भागात पाहावयास मिळते. आग्रा, खजुराहो, अजंठा वेरूळ यासारखी ठिकाणे अनेक वर्षांपासून परदेशी पर्यटकांच्या पसंतीची म्हणून ओळखली जातात. ही ठिकाणे पाहाण्यासाठी अनेक वर्षांपासून देश-विदेशातील पर्यटक येत असतात. गोवा हे पर्यटकांच्या दृष्टीने आवडीचे पर्यटन स्थळ आहे. या पर्यटनस्थळांच्या क्षेत्रातील हजारो जणांचे उदरनिर्वाह पूर्णतः तेथे येणार्या पर्यटकांवर अवलंबून असतात. पण गेल्या 5-6 महिन्यांपासून एक रुपयांचीही उलाढाल न झाल्याने आणि आगामी काही महिनेही ती होण्याची शक्यता नसल्याने हे सर्व घटक अक्षरशः गलितगात्र झाले आहेत. एप्रिल-मे हा सुट्यांचा हंगाम गेला, त्यानंतर पावसाळी पर्यटनाचा हंगामही गेला, आता दिवाळी-ख्रिसमस आणि नववर्षाचा हंगामही निसटून जाणार आहे. म्हणजेच जवळपास 8 ते 10 महिन्यांहून अधिक काळ एक रुपयाचीही मिळकत न झाल्यास या क्षेत्रातील लोकांनी गुजराण कशी करायची? आज महाराष्ट्रात, देशात कित्येक पर्यटन व्यावसायिकांनी बराच काळ वाट पाहून आपली कार्यालये बंद केली आहेत. सुरुवातीचे काही दिवस पदरमोड करुन कर्मचार्यांचे वेतन अदा केले; पण नाईलाजाने त्यांनाही कामगारकपात करावी लागली आहे. विमान कंपन्यांनीही कामगार कपात केली आहे. टॅक्सीवाले, खासगी बसेसवाले, पर्यटनस्थळी असणारे छोटे-मोठे व्यावसायिक, विक्रेते, गाईड, बोटींगवाले अशा असंख्य जणांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. ही सर्व भीषण परिस्थिती लक्षात घेता केंद्र सरकारने पर्यटनक्षेत्रासाठी विशेष पॅकेज देण्याची नितांत गरज आहे. पर्यटन व्यावसायिकांना आयकर, जीएसटी, पीएफ, ईएसआय आणि अन्य वैधानिक कर, शुल्क, उपकर या सर्वांतून पूर्ण सवलत देण्याची गरज आहे. तसेच बँकांच्या कर्जांच्या हप्त्यातून आणखी किमान एक वर्षासाठीची सवलत मिळणे आवश्यक आहे. यापलीकडे जाऊन पर्यटन उद्योग पूर्ववत करण्यासाठी एका स्वतंत्र कोषाची निर्मिती करण्याची गरज आहे. साधारणतः 50 हजार कोटी रुपयांचा हा फंड असला पाहिजे. या माध्यमातून पुढील पाच वर्षे व्याजमुक्त कर्ज आणि अन्य काही सवलती दिल्या गेल्या पाहिजेत. सरकारने तातडीने याबाबत उपाययोजना न केल्यास या क्षेत्राचे दिवाळे निघण्यास वेळ लागणार नाही. तसे झाल्यास अर्थव्यवस्थेसाठी आणि समाजासाठी ती फार मोठी हानी ठरेल. आज सर्वच क्षेत्रांना कोरोनाचा फटका बसलेला असला तरी पर्यटन क्षेत्राला बसलेली झळ सर्वाधिक आहे, हे नाकारता येणार नाही. म्हणूनच केंद्राने ताबडतोबीने पर्यटन उद्योगासाठीच्या पॅकेजची घोषणा करणे आवश्यक आहे.