दैनिक स्थैर्य । दि. ०१ फेब्रुवारी २०२३ । फलटण । 19 वर्षांखालील मर्यादित 20 षटकांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय महिला संघ अंतिम सामन्यात इंग्लंड संघावर दणदणीत विजय मिळवत विश्वविजेता ठरला. तर दुसरीकडे क्रिकेट विश्वात फ्रेंचायझी लिग मध्ये जखविख्यात असलेल्या आयपीएल स्पर्धेच्या धर्तीवर यंदापासून बीसीसीआय महिला क्रिकेट स्पर्धा आयोजित करणार असून या स्पर्धेतील संघ व्यवस्थापनाच्या हक्कासाठी लिलाव प्रक्रियेत लावण्यात आलेली हजारो, शेकडो कोटींची बोली लक्षणीय ठरली आहे. या दोन घटनांमुळे भारतीय महिला क्रिकेट पुरुषांच्या बरोबरीने जगात अव्वल असल्याचे नक्कीच अधोरेखित झाले आहे.
वास्तविक पाहता हॉकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ; मात्र भारतीयांसारखे क्रिकेट वेड जगात कुठेही आढळणार नाही. क्रिकेट रसिकांच्या प्रोत्साहनामुळे भारतीय क्रिकेटला आजवर एक ना अनेक दिग्गज पुरुष खेळाडू लाभले आहेत. कपील देव, सुनील गावसकर, सचिन तेंडूलकर, महेंद्रसिंग धोनी, विरोट कोहली ही यातील प्रमुख नावे क्रिकेट शौकिनांच्या मनावर कायम अधिराज्य गाजवणारी आहेत. याच परंपरेला साजेशी कामगिरी भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंकडून घडायला सुरुवात झाली असून क्रिकेटविश्वावर हुकुमत गाजवण्याचा भारतीय पुरुष खेळाडूंचा कित्ता महिला खेळाडूंकडूनही गिरवला जाईल अशी गुणवत्ता त्यांच्याकडून दाखवली जात आहे; हे कौतुकास्पद आहे.
भारतात 16 व्या शतकात क्रिकेटची सुरुवात झाली. 1721 मध्ये पहिला क्रिकेटचा सामना खेळला गेला. त्यानंतर 1848 मध्ये मुंबईत पॅरिस समुदायानं पहिला क्रिकेट क्लबची स्पापना केली. भारतीय संघानं पहिला कसोटी सामना 1932 मध्ये इंग्लंडविरुद्ध खेळला. जगभरात महिला क्रिकेटचा प्रचार आणि आवड निर्माण करण्यासाठी 1958 मध्ये आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटची स्थापना केली होती. तर भारतात भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनची स्थापना 1973 मध्ये झाली. भारतीय महिला संघानं 1976 मध्ये पहिला सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला. त्यानंतर महिला क्रिकेटमध्ये सुधारणा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेट परिषदेचे 2005 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये (आय.सी.सी.) विलीनीकरण करण्यात आले. त्यापाठोपाठ 2006 मध्ये, भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बी.सी.सी.आय.) विलीनीकरण करण्यात आले. त्यापूर्वी महिला क्रिकेटचा फारसा बोलबाला नव्हता.
आता गेल्या काही वर्षांपासून आय.सी.सी. कडून महिलांच्या जागतिक क्रिकेट स्पर्धांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जात आहे. भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, पाकिस्तान, वेस्टइंडिज, न्यूझीलंड, साऊथ अफ्रिका या पुरुष क्रिकेटमध्ये आघाडीवर राहिलेल्या देशांचे संघ महिला क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी दाखवत आहेत. यामध्ये भारतीय महिला उच्चप्रतीचे क्रिकेट खेळत असून त्याचीच झलक नुकत्याच झालेल्या 19 वर्षांखालील महिला विश्वचषक स्पर्धेत पहायला मिळाली. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर अंडर नाईनटीन टी ट्वेंटी विश्वविजेतेपदावर भारताचे नाव कोरले. भारतीय वरिष्ठ महिला संघाला अद्याप अशी कामगिरी करता आली नसली तरी युवा खेळाडूंचे हे यश उद्याचा विजय नक्कीच खुणावत आहे; असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
भारतीय महिला क्रिकेटसाठी आणखीन एक नवीन आयाम ठरणार आहे; ते म्हणजे यंदाचे महिला प्रिमीयर लिग. बीसीसीआयने महिला क्रिकेटला उत्तेजन देण्यासाठी आयपीएलच्या धर्तीवर नियोजित केलेल्या वुमन्स प्रिमीयर लिगच्या संघ व्यवस्थापनाचे अधिकार खरेदी करण्यासाठी लिलाव प्रक्रिया नुकतीच पार पडली. या प्रक्रियेत 1) अदाणी स्पोर्ट्सलाइन प्रा. लिमिटेड कडून 1289 करोड़ (अहमदाबाद), 2) इंडियाविन स्पोर्ट्स प्रा. लिमिटेड कडून 912.99 करोड़ (मुंबई), 3) रॉयल चैलेंजर्स स्पोर्ट्स प्रा. लिमिटेड कडून 901 करोड़ (बंगलुरु), 4) जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रा। लिमिटेडकडून 810 करोड़ (दिल्ली) आणि 5) कैप्री ग्लोबल होल्डिंग्स प्रा. लिमिटेड कडून 757 करोड़ (लखनऊ) असे 5 संघांचे हक्क विकत घेण्यात आले आहेत. महिला क्रिकेटला मिळालेला हा व्यावसायिक प्रतिसादही लक्षणीय आहे. शिवाय आयपीएल स्पर्धेने जसे भारतीय पुरुष संघाला उद्योन्मुख, गुणवान खेळाडू दिले तसेच उलटअर्थी अनेक उद्योन्मुख खेळाडूंना जागतिक दर्जाचा प्लॅटफॉर्म मिळवून दिला त्याचप्रकारे आता ही होऊ घातलेली स्पर्धा महिला क्रिकेटसाठी फायदेशीर ठरेल आणि पर्यायाने भारतीय महिला क्रिकेटचा दर्जा आणखीन उंचावेल अशी अपेक्षा नक्कीच आहे.
शेवटचा मुद्दा – गेल्या काही वर्षांपासून बीसीसीआयकडूनही महिला क्रिकेटला झुकते माप दिले जात आहे; हे वाखाणण्याजोगे आहे. नुकतेच जाहीर केलेले पुरुष व महिला खेळाडूंना समान मानधन, वारंवार आयोजित केले जाणारे आंतरराष्ट्रीय सामन्यांचे दौरे, महिलांच्या सामन्यांना प्रेक्षकांची गर्दी होण्यासाठी केले जाणारे प्रयत्न ही त्याची ताजी उदाहरणे आहेत. क्रिकेट म्हणजे फक्त पुरुषांचा खेळ ही संकल्पना आता 100% पुसली गेली असून क्रीडा रसिकांनीही महिला क्रिकेटला आपली पसंती वाढवावी, क्रिडा प्रेमी मुलींनीही या खेळाकडे करिअर म्हणून सकारात्मकपणे पहावे आणि पालकांनीही त्यांना क्रिकेट खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावे; यातून महिला क्रिकेट आणखीन गतीने समृद्ध होईल.
– रोहित वाकडे, संपादक, सा.लोकजागर.