फलटणमध्ये बी-बियाण्यांच्या दुकानातून तब्बल १ लाख १४ हजारांच्या टोमॅटो बियाणांची चोरी; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल


फलटण शहरातील रविवार पेठेत असलेल्या एका बी-बियाणे व खत विक्रीच्या दुकानातून ॲडव्हान्टा कंपनीच्या टोमॅटो बियाणांची तब्बल १ लाख १४ हजार रुपये किमतीची ६० पाकिटे चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्थैर्य, फलटण, दि. 25 मार्च : शेतकऱ्यांची फसवणूक किंवा शेतीमालाची चोरी होण्याच्या घटना आपण अनेकदा ऐकतो; परंतु आता चोरट्यांनी थेट कृषी सेवा केंद्रांना (बी-बियाण्यांच्या दुकानांना) लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. फलटण शहरातील रविवार पेठेत असलेल्या एका नामांकित बी-बियाणे आणि खत विक्रीच्या दुकानातून तब्बल १ लाख १४ हजार रुपये किमतीची अत्यंत महागडी ‘टोमॅटो बियाणांची पाकिटे’ चोरीला गेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी फलटण शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी व्यावसायिक राजकुमार मोहनलाल व्होरा (वय ७३ वर्षे, रा. राज बंगला, रिंग रोड, सोनवणे हॉस्पिटलसमोर, फलटण) यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात (दि. २१ मार्च रोजी) रीतसर फिर्याद दिली आहे.

फिर्यादीनुसार, राजकुमार व्होरा यांचे फलटण शहरातील रविवार पेठेत ‘राजकुमार मोहनलाल व्होरा’ या नावाने बी-बियाणे आणि रासायनिक खते विक्रीचे मोठे दुकान आहे. दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी त्यांनी विक्रीसाठी ‘ॲडव्हान्टा’ (Advanta) या नामांकित कंपनीची टोमॅटोची (वाण A.D.V. 575) एकूण ११० बियाणे पाकिटे दुकानात आणली होती.

दरम्यान, दि. ०७ मार्च २०२६ रोजी दुकानातील विक्री झालेल्या मालाचे मोजमाप (Inventory) करत असताना राजकुमार व्होरा यांच्या लक्षात आले की, दुकानातील ॲडव्हान्टा कंपनीच्या टोमॅटो बियाणांची तब्बल ६० पाकिटे कमी आहेत. त्यांनी लागलीच आपले मुले रोहित व कपिल यांच्यासोबत संपूर्ण दुकानातील माल पुन्हा तपासून पाहिला. मात्र, ही पाकिटे कुठेही मिळून आली नाहीत. त्यामुळे अज्ञात चोरट्याने दुकानातून ही बियाणांची पाकिटे लबाडीने चोरून नेल्याची त्यांची खात्री पटली.

चोरीला गेलेल्या मालाचा तपशील:

  • कंपनी व वाण: ॲडव्हान्टा कंपनीची टोमॅटोची A.D.V. 575 वाण असलेली पाकिटे (लॉट नंबर 582, DVP 0024)

  • पाकिटांचे वजन: प्रत्येक पाकीट ८ ग्रॅम

  • एकूण चोरीला गेलेली पाकिटे: ६० पाकिटे

  • एका पाकिटाची किंमत: १,९००/- रुपये

  • एकूण नुकसान (मुद्देमाल): १,१४,०००/- रुपये (एक लाख चौदा हजार रुपये)

दिनांक २६/१२/२०२५ ते ०७/०३/२०२६ या कालावधीत अज्ञात चोरट्याने ही पाकिटे दुकानातून चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी राजकुमार व्होरा यांच्या तक्रारीवरून फलटण शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पोलीस या महागड्या बियाणांच्या चोरीचा अधिक तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!