दैनिक स्थैर्य । दि. ०९ जुलै २०२२ । सोलापूर । कोकणातील गणेश उत्सवाप्रमाणे पंढरपूर येथील आषाढी वारीसाठी राज्यभरातून येणाऱ्या वारकऱ्यांच्या व भाविकांच्या वाहनांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टोलमाफी देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दिनांक 7 जुलै 2022 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाने पंढरपूर येथे येणाऱ्या व पंढरपूर येथून जाणाऱ्या पालख्या, वारकरी व भाविकांच्या वाहनांना टोल माफी देण्याबाबत शासन परिपत्रक निर्गमित केलेले आहे. त्याची अंमलबजावणी तत्काळ प्रभावाने सोलापूर जिल्ह्यातील सर्व टोल नाक्यावर सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे.
टोल माफीबाबत सार्वजनिक बांधकाम परिपत्रकानुसार पोलीस प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व टोलनाक्यांना वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी देण्याबाबत असे निर्देश दिनांक 7 जुलै 2022 रोजी दिलेले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील टोल नाक्यावर पंढरपूर येथे जाणाऱ्या व पंढरपूर येथून येणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी दिली जात आहे. प्रत्येक टोलनाक्यावर पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी थांबलेले असून ते स्वतःहून वारकऱ्यांचे आलेली वाहने थांबवून त्या वाहनाची माहिती घेऊन वाहनावर टोलमाफीबाबतचे स्टिकर्स लावत आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आषाढी वारीच्या निमित्ताने पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी सवलत दिल्यामुळे वारकरी समाधानी आहेत व अनेक वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभारही व्यक्त केलेले आहेत. ही सवलत प्रत्येक वर्षी लागू राहावी, अशी अपेक्षा वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वरवडे येथील टोलनाक्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाप्रमाणे वारकऱ्यांच्या वाहनांना टोल सवलत दिली जात असल्याची माहिती टोल नाक्याचे मॅनेजर जितेंद्र जाधव यांनी दिली आहे.