दैनिक स्थैर्य । दि. ०४ ऑक्टोबर २०२२ । सातारा । सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग पुणे अंतर्गत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापुर जिल्ह्यातील विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर येणाऱ्या रस्त्यांवर असलेल्या खड्ड्यांबाबत तक्रारी नोंदविण्यासाठी टोल फ्री क्र.१८००२३३१५४८ कार्यान्वित करण्यात आला आहे.
तक्रारीसाठी ही दूरध्वनी सेवा सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत सुरु असणार आहे. सामान्य नागरिकांना सा. बां. विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर असलेल्या खड्ड्यांबाबत काही तक्रार नोंदवायची असल्यास त्यांनी ती वरील दूरध्वनी क्रमांकावर नोंदवावी. तक्रार नोंदविताना तक्रारदाराचे नाव व दूरध्वनी क्रमांक नोंदवावा, जेणेकरुन तक्रारीवर केलेल्या कार्यवाहीबद्दल संबंधितास कळविणे शक्य होईल.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारितील राज्यमार्ग आणि प्रमुख जिल्हा मार्गांवर खड्ड्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी विभागाने आपले संकेतस्थळ www.mahapwd.com यावर ‘सिटीझन’ या भागात ‘पॉटहोल रिलेटेड कम्प्लेंट’ (खड्ड्यांबाबत तक्रार) मध्ये तक्रार नोंदविण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. नागरिकांनी या सुविधेचा उपयोग करुन सार्वजनिक बांधकाम विभागास खड्डेमुक्त रस्ते वापरात ठेवण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन सहायक मुख्य अभियंता मिलिंद बारभाई यांनी केले आहे.