आजचा लेख असे भारी जड, पेलता पेलता होईल जरा अवघड

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ डिसेंबर २०२२ । फलटण ।

लठ्ठ पणा वसे जिथे जिथे ,
आजारांना आमंत्रण मिळे तिथे तिथे !!

सध्या जाड होणे आणि वजन वाढणे हे खूप लोकांमध्ये दिसू लागले आहे. वजन वाढायला सहसा काहीच करावे लागत नाही पण ते जर कमी करायचे असेल तर मात्र फारच कष्ट घ्यावे लागतात हे नक्की.
आता ह्या वाढलेल्या वजना मुळे शरीरावर काय काय परिणाम होतो ते सविस्तर बघुयात.
Body Mass Index (BMI) म्हणजेच आपल्या उंची प्रमाणे आपले वजन किती असावे याचे एक ठरलेले मोजमाप असते. त्याप्रमाणे BMI हा नेहमी २५ च्या आत असावा म्हणजे उत्तम.
२५ ते ३० पर्यंत Overweight म्हणता येईल .
३० च्या वर असल्यास आपण जाड झालो आहे असे म्हणता येईल .

१. सर्वात पहिल्यांदा जाडी वाढली की आपल्या शरीराची कार्यक्षमता कमी होते. उत्साह कमी होतो , मरगळ वाढते आणि मग साहजिकच बसून काम करण्याकडे कल वाढतो आणि अजून वजन वाढते 😔.
२. शरीराचे वजन अपेक्षेपेक्षा जास्त असल्यास शरीरातील चरबीचे प्रमाण खूप वाढते आणि मग साहजिकच त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते.
३. लठ्ठपणाचा आणि डायबेटिस यांचा फार जवळचा संबंध आहे. ८० टक्के लठ्ठ माणसांना डायबेटिस झालेला आपल्याला आढळतो.
४. लठ्ठ पणा मुळे high BP (उच्च रक्तदाब) याचा त्रास पण जडतो . त्यामुळे ते कंट्रोल करण्यासाठी गोळ्या घ्याव्या लागतात .
५. लठ्ठ पणा मुळे fatty liver हा त्रास जडतो आणि त्यामुळे पुढे जाऊन लिव्हर cirrhosis व्हायची शक्यता असते.
६. वजन वाढल्यामुळे शरीराचा अतिरिक्त बोजा आपल्या गुढघे आणि खुब्यांच्या सांध्यावर पडून त्याची झीज लहान वयातच होते.
७. लठ्ठपणा मुळे कंबरदुखी चे प्रमाण ही वाढलेले दिसते कारण स्नायूंची जागा ही चरबी घेते. आणि मग स्नायू अखडण्याचे प्रमाण जास्त होते.
८. स्थूलपणा मुळे मानसिक आरोग्य पण ढळते आणि depression आणि mood changes सारखे मानसिक आजार जडलेले दिसते.
९. लठ्ठ पणा मुळे सध्या लग्नं झालेल्या तरुण स्त्रियां मध्ये वंध्यत्वाचे प्रमाण वाढीला लागले आहे आणि मग test-tube baby कडे कल दिसू लागला आहे.
१०.लठ्ठ पणा मुळे heart attack आणि brain stroke चे प्रमाण वाढते हे आता संशोधनातून सिद्ध झाले आहे.
तर या वरील सर्व आजारांना लठ्ठ पणा आणि लठ्ठ पणाचं कारणीभूत आहे.

आता सर्वात महत्त्वाचे दोन प्रश्न.
१. वजन वाढू नये म्हणून काय केले पाहिजे ?
आणि
२. वाढलेले वजन आटोक्यात कसे आणायचे ?

१. वजन वाढू नये म्हणून काय केले पाहिजे.
योग्य आहार , योग्य विहार आणि योग्य विचार ही त्रिसूत्री पाळली तर वजन आटोक्यात राहिलेच म्हणून समजा.
सध्या लहान मुला – मुलीं मध्ये स्थूल पणा अती वाढीस लागलेला दिसतो . जंक फूडस् , सतत मोबाईल आणि लॅपटॉप घेऊन बसणे , रात्री उशिरा झोपणे , आणि सकाळी उशिरा उठणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे व्यायामाचा अभाव आणि पाहिजे तेव्हा आणि पाहिजे तसे खाणे .ह्यामुळे एक viscious वर्तुळात आपण (म्हणजे ही तरुण मुलं मुली) अडकतात आणि मग त्यातून बाहेर पडणे फार कठीण होऊन जाते. त्यातच Metabolic Syndrome म्हणून एक आजार असतो. तो असल्यास मग मात्र Bariatric surgery करण्या पर्यंत मजल जाते.

-तीन वेळा मित आहार (नाष्टा राजासारखा , दुपारचे जेवण प्रधानजी सारखे आणि रात्री जे जेवण भिकाऱ्या सारखे).
-तेल तूप याचे कमी सेवन ,
-दारू(विशेषतः बिअर ) वर्ज करावी. त्यांनी वजन झपाट्याने वाढीला लागते आणि रोजचे सेवन असेल(बिअर चे) तर मग काही विचारूच नका.
तीन आहारांमध्ये काहीही न खाणे हे महत्त्वाचे !
-पाणी भरपूर पिणे. (दारू पेक्षा हे केव्हांही उत्तम आणि आरोग्यदायी ).
विशेषतः alkaline pH ८ किंवा त्याहून जास्त pH चे पाणी पिल्यास आरोग्य अती उत्तम राहते .(माझ्या पुढील लेखा मध्ये या बद्दल सविस्तर विवरण होईलच.)
– योग्य आणि नियमित व्यायाम . प्रत्येकानी आपली क्षमता आणि वय लक्षात घेऊन जसा आणि जेव्हा जमेल तेव्हा साधारण अर्धा ते एक तास रोज व्यायाम करणे फार फार जरुरीचे आहे. वजन तर आटोक्यात राहिलच पण आरोग्य ही उत्तम राहील आणि दीर्घायुषी होण्यास नक्कीच मदत होईल. आजार होऊ नये म्हणून नित्यानियमानी व्यायाम करणे केव्हाही फायद्याचेच ठरते . आजार होऊन तो निस्तरण्यापेक्षा तो होऊ न देणे चांगले नाही का !
– मानसिक संतुलन आणि आरोग्य उत्तम ठेवणे गरजेचे आहे. सकारात्मकता ठेवणे आणि परिस्थितीचा स्वीकार करून त्यात मार्ग काढणे हे शिकले पाहिजे. आलेली परिस्थिती माझ्याच वाट्याला का ? हा प्रश्न कधी पडलाच नाही पाहिजे .
मन चंगा तर वजन उत्तम राहण्यास खास मदतच होते.

२. वाढलेले वजन आटोक्यात कसे आणायचे ?
इतका वेळ आपण वजन वाढू न देण्यासाठी काय करायला पाहिजे ते बघितले आता ते जर आधीच वाढले असेल आणि डोईजड झाले असेल तर काय करावे!
स्त्रियां मध्ये पुरुषांच्या तुलनेने वजन प्रमाणा पेक्षा जास्त लवकर वाढते .. त्याला बरीच कारणे देता येतील . Pregnancy हे एक प्रमुख कारण आहे , पण ती त्यावेळेची गरज पण असते. Delivery नंतर स्त्रियांनी लक्ष देऊन वजन कमी केले पाहिजे.

“वजन कमी करण्यासाठी ठाम निश्चयच करावा लागतो अन्यथा ते कमी होणे नाही”

वजन कसे कमी करावे ते आता बघुयात:-

– ५० टक्के Diet control
आणि
– ५० टक्के व्यायाम आणि जीवन शैलितला बदल .

-Diet control करताना एखाद्या चांगल्या डाएटिशियन चा सल्ला जरूर घ्यावा.
योग्य वेळी योग्य आणि मोजकाच पण पौष्टिक आहार कसा घ्यावा , काय खावे, किती खावे आणि काय नक्की खाऊ नये याचे लीलया प्लॅन ते तुम्हाला देतील . इथे एक Word of Caution , शक्यतो नैसर्गिक आहारच घ्यावा , वजन कमी करण्याच्या गोळ्या शक्यतो टाळाव्यातच, कारण त्याचे दीर्घकालीन होणारे दुष्परिणाम फारच घातक ठरू शकतात आणि ते त्या तयार करणाऱ्या कंपन्या कधीच सांगत नाहीत .त्या महाग पण असतात.
– साखर वर्ज(न खाल्यास) केल्यास वजन कमी व्हायला खूप मदत होते.
– त्यादिवशीचे उरलेले अन्न संपवण्याकडे स्त्रियांचा कल असतो आणि तेच नडते.
– व्यायाम मात्र एखाद्या ट्रेनर च्या सल्यानेच करावा. सुरवात सावकाश , हळू हळू क्षमते नुसार व्यायाम वाढविणे आणि High intensity training workouts करणे महत्त्वाचे .
व्यायाम केल्यावर थळथळून घाम येऊन चरबी विरघळल्या शिवाय वजन कमी होणे नाही .

– कुठल्या व्यायामाने वजन कमी होण्यास नक्की मदत होते :-
रोज भर भर चालणे,
पळणे ,
पूर्ण क्षमतेने(full strech करून) घातलेले रोजचे १२ सूर्यनमस्कार.
सायकलिंग
Elliptical training.
एरोबिक्स ट्रेनिंग ( इथे ते करताना गुढग्यावर अतिरिक्त ताण येणार नाही याची काळजी घ्यावी कारण असे बरेच patients माझ्याकडे दुखापत झाल्या मुळे येतात).
योगासने , प्राणायाम विशेषतः कपाल भाती भासरिका प्राणायाम.
पोहण्यानी वजन कमी होत नाही कारण पोहल्यानंतर खूप भूक लागते आणि आपण नेहमी पेक्षा जास्त खातो मग वजन वाढणारच ना 😄.

तर प्रियजन हो ,

रहा निरोगी राहा फिट ,
वजन राहील आटोक्यात ऑटोमॅटिक!
असाल जाड आणि स्थूल आधीपासून,
करा संकल्प सुदृढ आणि सुडौल होण्याचा आत्तापासून!!
असेल तुमचा बॉडी मास इंडेक्स कमी ,
निरोगी जीवन आणि समाधानी मन याची मिळेल आपोआपच हमी !!!

जन हितार्थ जारी 🙏🙏

डॉ प्रसाद जोशी
अस्थिरोग शल्य – चिकित्सक
जोशी हॉस्पिटल प्रा ली
फलटण .


Back to top button
Don`t copy text!