दैनिक स्थैर्य । दि. ०९ फेब्रुवारी २०२३ । मुंबई । “रमाईने लुगडयाला सतरा ठिगळे लावून संसार जोडला, स्वतः उपाशी पोटी राहून आपल्या कुटुंबाचा भार सांभाळला, प्रसंगी बाबसाहेबांना शिक्षणासाठी मदत केली, आपल्या चार मुलांना मातीआड केलं आणि नऊ कोटी लेकरांच भविष्य घडवलं, त्यांच्यासाठी तिने आपल्या भावना आणि आपल्या सुखाला त्यागल म्हणूनच आज आम्ही सुखाने जीवन जगतोय” असे उद्गार प्रमुख वक्त्या वनिता ताई जाधव (केंद्रीय शिक्षिका, भारतीय बौद्ध महासभा) यांनी रमाई माता यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात काढले.
बौद्धजन पंचायत समिती यांच्या वतीने महासुर्याची सावली, कोट्यवधींची माऊली महामाता रमाई यांचा १२५ वा शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती उत्सव उपसभापती मा. विनोदजी मोरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
सदर प्रसंगी बौद्धजन पंचायत समितीचे आदरणीय सभापती आनंदराज आंबेडकर साहेब, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, माजी कार्याध्यक्ष व विश्वस्त किशोरजी मोरे, उपकार्याध्यक्ष अशोक कांबळे, एच.आर.पवार, मनोहर मोरे, चंद्रमनी तांबे, अंकुश सकपाळ, सरचिटणीस राजेश घाडगे, खजिनदार नागसेन गमरे, अतिरिक्त चिटणीस विठ्ठल जाधव, चिटणीस श्रीधर साळवी, यशवंत कदम, भगवान तांबे, प्रमोद सावंत, संदेश खैरे, श्रीधर जाधव, रवींद्र शिंदे, नवीन तांबे, राजाभाऊ तथा रामदास गमरे, तुकाराम घाडगे व्यवस्थापक मंडळाचे सदस्य, महिला मंडळाच्या सुशिलाताई जाधव, अंजली मोहिते, प्रमिलाताई मर्चंडे, सुजाता पवार, रेश्मा जाधव, सायली साळवी, प्रज्ञा जाधव, मानसी जाधव, सरोजिनी शिरगावकर, माधवी मोहिते, नीता जाधव आदी महिला तसेच प्रत्येक विभागातील गटप्रतिनिधी, व्यवस्थापन समिती सदस्य, शाखांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश घाडगे यांनी केले तर धार्मिक विधी मंगेश पवार आणि मनोहर मोरे यांनी केले.
आपल्या भाषणात प्रमुख वक्त्या वनिता जाधव पुढे म्हणाल्या की “रमाईने निराधार लोकांना मातृत्वाच प्रेम दिल, आपल्या तन, मन, धनाचा व सर्व भाव-भावनांचा व सुखांचा त्याग करून नऊ कोटी कुळांचा उद्धार केला, बाबासाहेब शिक्षणासाठी परदेशी असताना अनेक काबाडकष्ट करून त्यांच्या शिक्षणाचा भार त्यानी सांभाळला त्यांच्या या त्यागामुळेच आज आपल्या सारख्या तळागाळातील बहुजन बांधवांना सोन्याचे दिवस आले आहेत, आपल्याला घडवणाऱ्या बाबासाहेबांना माता रमाईच्या त्यागाने घडवलं” असे विचार त्यानी व्यक्त केले. माता रमाई यांचं खडतर जीवन, त्यातील प्रसंग वर्णन करत मांडला तेव्हा अक्षरशः महिलांना अश्रू अनावर झाले होते.
सरतेशेवटी सभापती मा. आनंदराज आंबेडकर यांनी ही सर्वांना शुभेच्छा दिल्या व राजेश घाडगे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.