मुंबईत ‘दर्पण’ कारांचे स्मारक व्हावे

- रविंद्र बेडकिहाळ, अध्यक्ष, महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी, फलटण.

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


आज 6 जानेवारी पत्रकार दिन. या दिवशी 193 वर्षापूर्वी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईमधून मराठी भाषेतील पहिले ‘दर्पण’ वृत्तपत्र सुरू केले. तथापि अजूनपर्यंत तरी मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार व महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे स्मारक राज्य शासनाने किंवा मुंबईतल्या कोणत्याही पत्रकार संघटना, मुंबई महानगरपालिका याचेपैकी कोणीही मराठी माणसांच्या मुंंबईमध्ये उभारले नाही. मराठी माणूस केंद्रस्थानी ठेवून राज्य करणार्‍यांनी जांभेकरांचे भव्य राष्ट्रीय स्मारक जागतिक उद्योगाच्या क्षेत्रातील आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये उभारावे. त्यासाठी राज्यातील सर्वच पत्रकार, प्रसार माध्यमातील संघटनांनी एकत्र येऊन राज्य शासन व मुंबई महानगरपालिकाकडे आग्रही मागणी करावी आणि मुंबईचे भूषण असणार्‍या आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची 179 वर्षांची उपेक्षा संपवावी.

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी मुंबईतून 6 जानेवारी 1832 रोजी पहिले मराठी इंग्रजी संमिश्र वृत्तपत्र आणि 1 मे 1840 पासून मुंबईतूनच मराठी भाषेतील पहिले ‘दिग्दर्शन’ मासिक सुरू केले. ‘दर्पण’ आणि ‘दिग्दर्शन’ यांनी भारतीय व पाश्‍चिमात्त्य ज्ञान, विज्ञान, इतिहास, समाज दर्शन, खगोलशास्त्र, गणित व भाषा, साहित्य, संस्कृती यातील विचारांचे दर्शन घडविले. तसेच आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत जांभेकरांच्या या दोन्ही मुद्रित प्रसारमाध्यमांनी समाज सुधारणांच्या चळवळीतून सर्वात प्रथम प्रबोधनाची पताका फडकावली होती. म्हणूनच महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीतले पहिले समाजसुधारक व प्रबोधन चळवळीचे पहिले अग्रदूत म्हणून आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचे श्रेष्ठत्व आधुनिक महाराष्ट्राने मान्यच केले आहे. तथापि एवढे श्रेष्ठत्व असलेल्या ‘दर्पण’कारांचे मुंबईमध्ये, म्हणजेच त्यांच्या कर्मभूमीत अद्याप तरी काहीच स्मारक होऊ नये ही जांभेकरांच्या पासून सुरू झालेल्या मराठी पत्रकारितेतील एक शोकांतिकाच आहे असे खेदाने नमूद करावेसे वाटते.  आज 6 जानेवारी हा ‘दर्पण’ पत्राचा, पर्यायाने मराठी पत्रकारितेचा शुभारंभाचा दिवस राज्यभर पत्रकार दिन म्हणून संपन्न होत असतो. या दिवशी सद्य स्थितीतील पत्रकारितेची दशा व दिशा, स्थिती व वस्तुस्थिती, वास्तवता व आव्हाने याबाबत चिंतन, मार्गदर्शन व आत्मपरिक्षण या आवश्यक बाबींबरोबरच ‘दर्पण’कारांचे स्मारक मराठी पत्रकारितेची जन्मभूमी असणार्‍या महाराष्ट्राच्या राजधानीत म्हणजे मुंबईत अद्यापपर्यंत कां झाले नाही याचेही आत्मपरिक्षण राज्यकर्ते व प्रसारमाध्यमातील सर्वच पत्रकार, वृत्तपत्रे व त्यांच्या संघटनांनी करण्याचाही ‘पत्रकार दिन’ हा योग्य दिवस आहे असे वाटते.

मुंबईतील महत्त्वपूर्ण योगदान :

सन 1818 मध्ये हिंदवी स्वराज्यातील पंतप्रधानकी असलेल्या पुण्याच्या पेशवाईची अखेर ब्रिटीशांच्या आक्रमणामुळे झाली आणि मराठी माणसाचे ‘आपले स्वराज्य’ गेले. पण आपले स्वराज्य आणि स्वातंत्र्य कां गेले याची चर्चासुद्धा त्याकाळात होत नव्हती. कारण सर्वच समाज गोंधळलेला होता. या परिस्थितीत नेमके काय केले पाहिजे याचे कोणी मार्गदर्शनही करीत नव्हते. पण त्याकाळी मुंबईच्या बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत सन 1825 च्या सुमारास बाळशास्त्री जांभेकर या कोकणातल्या (पोंभुले जि.सिंधुदुर्ग येथील) एका गरीब विद्यार्थ्याने पुढील इंग्रजी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता. त्यांनी सावधपणे प्रथम इंग्रजी भाषेत नैपुण्य मिळविले आणि त्याबरोबरच गणित, विज्ञान, भूगोल, इतिहास या विषयांचाही सखोल अभ्यास केला. तेव्हाच त्यांच्या लक्षात आले की, महाराष्ट्रात आपले स्वराज्य गेल्यानंतर लोकांना लोकशिक्षणाची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी इंग्रजी भाषेचा अभ्यास केला पाहिजे. या भाषेच्या अभ्यासामुळे पाश्‍चात्यांच्या विविध विषयातील ज्ञान विज्ञानाची माहिती आपल्या लोकांना मिळेल. तत्कालिन पाश्‍चात्य संस्कृतीतील आधुनिक माहितीमुळे हे ज्ञान आपणही घेऊ शकतो हा एक नवा आत्मविश्‍वास निर्माण होईल अशी बाळशास्त्रींची धारणा होती.

त्यादृष्टीने बाळशास्त्रींनी आपली पावले टाकायला सुरूवात केली. त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेमुळे तत्कालिन बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन संस्थेच्या पदाधिकार्‍यांना त्यांची दखल घ्यावी लागली आणि जांभेकरांना विद्यार्थी असतानाच शिक्षक म्हणून नियुक्ती दिली. त्यानंतर याच संस्थेने सन 1834 साली एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटचे रूपांतर एल्फिन्स्टन महाविद्यालयात केले. त्यावेळीही जांभेकरांना सहाय्यक प्राध्यापक, नंतर प्राध्यापकपदी नियुक्ती दिली. सर्वात विशेष म्हणजे त्यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन याच संस्थेचे त्यांना प्रथम सहाय्यक सचिव (1830) व नंतर सचिव (1832) अशीही नियुक्ती आधीच दिली होती. एकाच शिक्षण संस्थेत प्रथम विद्यार्थी, नंतर अध्यापक, सहाय्यक सचिव, सचिव, मुंबई इलाखा दक्षिण विभागाचे मुख्य शाळा तपासणीस, सहाय्यक प्राध्यापक, प्राध्यापक अशी सन्माननीय नियुक्ती मिळाली. असा विशेष सन्मान मिळविणारे त्यावेळी ते एकमेव भारतीय होते. शैक्षणिक सेवेत असतानाच त्यांनी शालेय शिक्षणासाठी उपयुक्त अशी पाठ्यपुस्तकेही लिहिली. त्यात शास्त्र, गणित, व्याकरण, भूगोल, इतिहास या विषयाचा समावेश होता. इंग्रजी मधील काही उपयुक्त ग्रंथाचेही त्यांनी मराठीत भाषांतर करून नवीन ग्रंथांची निर्मिती केली. त्यांनी लेखक, संपादक व भाषांतर या भूमिकेतून त्यांनी एकूण 17 ग्रंथांची निर्मिती केली आहे. याबरोबरच उत्कृष्ट मराठी ग्रंथांना पारितोषिके द्यावीत ही त्यांची कल्पना तत्कालिन सरकारने स्वीकारली व पहिल्यांदाच (1835) ‘उत्कृष्ट ग्रंथ पारितोषिक’ योजना सुरू केली व त्याचे प्रमुख पदही जांभेकरांनाच दिले. आणखी एक त्यांचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे मौलिक योगदान म्हणजे बाळशास्त्रींनीच मराठी साहित्याचे अमृत लेणे असलेल्या ‘ज्ञानेश्‍वरी’ची पहिलीच मुद्रित प्रत सन 1845 मध्ये मुंबईतल्या छापखान्यात छापून प्रकाशित केली होती. ज्ञानेश्‍वरांनी शके 1212 मध्ये लिहिलेली ‘ज्ञानेश्‍वरी’ शके 1767 पर्यंत फक्त हस्तलिखितामध्येच होती. ती उणीव जांभेकरांनी पहिली मुद्रित प्रत तयार करून दूर केली. इन्स्टिट्यूट व महाविद्यालय यामधील अध्यापक प्राध्यापक यांच्या प्रथम पदवीशिवाय, त्यांना प्रत्यक्ष शिक्षक म्हणून काम करण्याआधी स्वतंत्र असे शास्त्रशुद्ध शिक्षण प्रशिक्षण देऊन प्रशिक्षित केले पाहिजे ही कल्पनाही जांभेकरांनी प्रथम सरकारपुढे मांडली व सरकारने लगेचच स्वीकारली. एवढेच नव्हे तर या प्रशिक्षण विद्यालयाचे पहिले संचालक म्हणून जांभेकरांचीच (1845) नियुक्ती केली. मुंबईत बाहेरून शिक्षणासाठी विशेषतः कोकणातून येणार्‍या गरीब विद्यार्थ्यांची राहण्याची सोय होण्यासाठी जांभेकरांनी मुंबईच्या कोलभाट भागात एक घर भाड्याने घेऊन तिथे मुंबईतले पहिले विद्यार्थी वसतिगृह (1826) सुरू केले. आपल्या संस्थेतील विद्यार्थ्यांना तसेच समविचारी अध्यापक, प्राध्यापक, विविध क्षेत्रातील नागरिक यांना समाजापुढील आव्हाने, विविध शासन निर्णय, सार्वजनिक हिताचे विविध प्रश्‍न, इत्यादींची माहिती देण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून ‘नेटिव्ह इंम्प्रूव्हमेंट सोसायटी’ ही संस्थाही जांभेकरांनी (1842) मुंबईत सुरू केली. वाचन संस्कृतीचीही उत्तम जाण असणार्‍या जांभेकरांनी सन 1845 मध्ये पहिले सार्वजनिक ग्रंथालय म्हणून ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररी’ सुरू केली. 75 वर्षे ही संस्था उत्तम रितीने चालू होती. पुढे त्यांच्या चाहत्यांनी याचे रूपांतर ‘पीपल्स फ्री रिडींग रूम’ मध्ये (मुक्त लोकवाचनालय) केले. ब्रिटीशांनी लंडनमध्ये स्थापित केलेल्या रॉयल जिओग्राफिकल सोसायटीच्या मुंबई शाखेचे कारभारी म्हणूनही त्यांची (1842) नियुक्ती झाली होती.

मराठी पत्रकारितेचा शुभारंभ – सर्वोत्तम योगदान :

शालेय शिक्षण घेत असतानाच बाळशास्त्री ज्ञान ग्रहणाबद्दल सदैव जागृत व चिकित्सक वृत्तीचे असल्यामुळे त्यांनी मराठी, इंग्रजीशिवाय अन्य 12 भाषांचेही ज्ञान संपादन केले. त्यामध्ये लॅटिन, ग्रीक, फारसी, फ्रेंच, बंगाली, गुजराथी, हिंदुस्थानी हिंदी, कानडी, तेलगू या भाषांचा समावेश होता. त्यामुळे या विविध भाषांतील ग्रंथ वाचनामुळे त्यांची सर्व क्षेत्रातील जाण वाढली. विविध माहितींचे भांडारच खुले झाले. त्याकाळात इंग्रज सरकारचे मुख्य कार्यालय कलकत्ता (बंगाल) येथे होते. तिथल्या अनेक धार्मिक सामाजिक चालीरिती, रूढी, परंपरांच्या विरोधात राजा राममोहन रॉय यांनी चळवळ उभी केली होती. सतीची अमानुष चाल, हुंडाबळी, बाल विवाह, विधवा पुनर्विवाह, विधवा केशवपन, इत्यादींचा त्यात समावेश होता. जांभेकरांना बंगाली भाषा अवगत असल्यामुळे त्यांना बंगालमधील या समाजसुधारणा चळवळींपासूनच प्रेरणा मिळाली. त्यातून त्यांच्या लक्षात आलं की, सध्या इंग्रजांविरूद्ध बंड करून स्वातंत्र्य मिळणार नाही. पण लोकशिक्षणातून, समाज सुधारणेतून पुन्हा आपले स्वातंत्र्य मिळविण्याची प्रेरणा मात्र आपण आधी जागृत करूया. त्यासाठी धार्मिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वैचारिक प्रबोधनाची आजच्या निद्रीस्त समाजाला खरी गरज आहे. त्यासाठीचे उत्तम व्यासपीठ म्हणजे वृत्तपत्र होय. म्हणून जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 पासून मुंबईतूनच पहिल्या मराठी वृत्तपत्राची सुरूवात केली. इंग्रजांच्या चाकरीत असूनही त्यांनी हे धाडस केले. सर्वच क्षेत्रात वृत्तपत्र या माध्यमाचा दबदबा कसा असावा याचे त्यांनी ‘दर्पण’ मधून दर्शन घडविले. शिक्षण, विज्ञान, शास्त्र, इतिहास, भूगोल, राजकारण, समाजकारण, पाश्‍चात्त्यांच्या सुधारणा मराठी भाषेत आणणे, साहित्य, संस्कृती, मराठी ग्रंथांना प्रोत्साहन, धार्मिक चिकित्सा व शुद्धीकरण, वृत्तपत्रातून कविता, निबंध, ग्रंथ परीक्षण, ग्रंथ पुरस्कार, विधवांचे शिक्षण, पुनर्विवाह, मुलींना वैदिक व अन्य शिक्षण, मुलींची मुंज का नाही, अशा अनेक क्षेत्रात त्यांनी ‘दर्पण’ मधून मुक्त चिंतन, स्फुट लेखन केले आहे. तसेच 1 मे 1840 पासून त्यांनी ‘दिग्दर्शन’ म्हणून पहिले मराठी मासिक सुरू केले. हे सर्व त्यांनी मुंबईतून केले. त्यामुळे त्या काळातील हिंदुस्थानात मुंबईचा लौकिक वाढविण्यात बाळशास्त्री जांभेकरांचे वरील सर्व क्षेत्रातील योगदान महत्त्वाचे ठरले.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही लेखन :

पुरातत्त्व संशोधन आणि भारतीय संस्कृतीचे संवर्धन यासाठी खरं तर इंग्रजांचेच फार मोठे योगदान आहे. त्यांनी यासाठी रॉयल एशियाटिक सोसायटीची लंडनमध्ये स्थापना केली होती. त्याची शाखा सध्या मुंबईत टाऊन हॉलमध्ये मुंबई एशियाटिक सोसायटी ही आता स्वायत्त संशोधन, संकलन संस्था आहे (स्थापना 1834). या सोसायटीने सन 1841 पासून आंतरराष्ट्रीय जर्नल सुरू केले आहे. बाळशास्त्री जांभेकर यांनी भारतीय पुरातत्त्व संशोधक म्हणून विविध ताम्रपट, शिलालेख यांचे भाषांतर इंग्रजीत करून त्यावरचे 11 लेख (90 पानांचे) या सोसायटीच्या जर्नल्समध्ये लिहिले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरातत्त्व, संस्कृती, भाषा संशोधनात हे प्रतिष्ठेचे जर्नल आहे. त्या काळात या जर्नलमध्ये लेखन करणारे पहिले भारतीय म्हणून बाळशास्त्री जांभेकरच होते. या सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये या सोसायटीसाठी योगदान दिलेल्या आणि विविध क्षेत्रात मौलिक लेखन, संशोधन केलेल्या मान्यवरांची दरबारी पद्धतीने तैलचित्रे लावली आहेत. त्यामध्ये सर जेम्स मॅकिनतोश, समाजशास्त्रज्ञ व पुरातत्त्व संशोधक डॉ.भाऊ दाजी लाड, विविध ज्ञान शाखांचे अभ्यासक भगवानलाल इंद्राजी, मिशनरी आणि शिक्षणतज्ञ जॉन विल्सन, न्यायमूर्ती के.टी. तेलंग, डॉ.शंकर पांडुरंग पंडित, डॉ.सर दिवाणजी जमशेटजी मोदी, डॉ.आर.जी. भांडारकर आणि नव्याने एक प्रसिद्ध साहित्यिक दुर्गा नारायण भागवत यांचा समावेश आहे. तसेच या टाऊन हॉलमधील विविध दालनात जगन्नाथ शंकरशेट, महामहोपाध्याय पां. वि. काणे, सर जमशेटजी जिजीभाय, माऊंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांचे संगमरवरी पुतळे आहेत. हे सर्व कर्तृत्ववान आहेत हे सत्य आहे. पण यांच्यापैकी कोणाहीपेक्षा बाळशास्त्रींचे कर्तृत्व निश्‍चितच कमी नाही. ही उणीव दूर करावी म्हणून आम्ही एशियाटिक सोसायटी मुंबईच्या पदाधिकार्‍यांना (जे सर्व मराठीच आहेत) अनेकवेळा भेटलो, लेखी विनंती केली. बाळशास्त्रींच्या कर्तृत्वाचे पुरावेही दिले. विशेष म्हणजे या सोसायटीचे जर्नल्स मधील सोसायटीने जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेले लेखही त्यांच्याच संग्रही डीव्हीडीत आहेत तेही त्यांना दाखवले. पण अद्याप या सोसायटीच्या दरबार हॉलमध्ये बाळशास्त्री जांभेकरांचे तैलचित्र लावले गेले नाही. मुुंबईतल्या मराठी माणसांनीच मुंंबईतल्याच कर्तृत्ववान मराठी महापुरुषाची अशी उपेक्षा केली आहे याचा खेद वाटतो.

मुंबई विद्यापीठातही उपेक्षा :

ब्रिटीश सरकारने शिक्षण क्षेत्रात जी काही चांगली कामे केली आहेत, त्यामध्ये मुंबईत स्थापन झालेले मुंबई विद्यापीठ हे एक आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे त्रिखंडात्मक पहिले संशोधित चरित्र त्यांच्याच वंशातील मराठी भाषेचे एक अभ्यासक कै.गणेश गंगाधर जांभेकर यांनी जांभेकरांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांचे मुंबई विद्यापीठात स्मारक व्हावे अशी मागणी केली होती. सन 1946 ला ‘दर्पण’कारांची पुण्यतिथी शताब्दि पुण्यात संपन्न झाली होती. त्यामध्ये कै. ग. गं. जांभेकर यांनी असे सुचविले होते की, आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या नावे मुंबई विद्यापीठाने विशेष अध्यासन (चेअर) स्थापन करावे. त्याचा त्यांनी पाठपुरावाही केला. त्याला यश आले. 3 नोव्हेंबर 1962 च्या मुंबई विद्यापीठ कार्यकारिणी सभेत ‘‘आचार्य बाळ गंगाधर शास्त्री जांभेकर प्रोफेसर ऑफ मॅथेमॅटिक्स’’ असे विद्यासन (चेअर) स्थापन करण्याचा निर्णय झाला. त्यासाठी लगेचच या विद्यासनाचे प्रमुख म्हणून प्रा.डॉ. श.शं. श्रीखंडे या नामांकित गणित शास्त्रज्ञाची नियुक्तीही करण्यात आली. पण काही काळातच ते बंदही झाले. खरं तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे ते मुंबईतील पहिले शैक्षणिक स्मारक झाले असते. हे विद्यासन पुन्हा सुरू करावे यासाठी मी स्वतः महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या माध्यमातून सन 1993 पासून ते आजपर्यंतच्या मुंबई विद्यापीठाच्या प्रत्येक कुलगुरूंकडे ही मागणी करीत आलो आहे. पण एकाही कुलगुरूने या मागणीची दखल घेतली नाही. आता तरी राज्य शासनाच्या उच्च शिक्षण विभागाने हे अध्यासन पुन्हा सुरू करण्याचे आदेश द्यावेत अशी अपेक्षा आहे.

….म्हणून बाळशास्त्री जांभेकरांचे भव्य स्मारक मुंबईत हवे :

‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या सर्व दैदिप्यमान असा कर्तृत्वाचा काळ मुंबईतच संपन्न झाला (1812 ते 1846). सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजच्या प्रचंड विस्तारलेल्या मराठी वृत्तपत्रसृष्टीचा शुभारंभच बाळशास्त्रींमुळे मुंबईतून झाला. तसेच वर उल्लेख केल्याप्रमाणे अनेक क्षेत्रातील त्यांचे पहिलेपण सुद्धा मुंबईतूनच झाले आहे. म्हणून त्यांचे भव्य स्मारक मुंबईमध्ये झाले पाहिजे. विशेष म्हणजे यापूर्वीही जांभेकरांचे सार्वजनिक स्मारक व्हावे अशी आग्रही मागणी तत्कालिन मुंबईतील सर्व भाषिक वृत्तपत्रांनी जांभेकरांच्या निधनानंतर (17 मे 1846) केली होती. मुंबई इलाख्याचे पहिले मराठी मुख्यमंत्री बा.ग. खेर, महामहोपाध्याय पा.वा. काणे, लोकनायक बापूजी आणे, तत्कालिन मुंबई सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती सर ऑर्स्किन पेरी व अनेक उच्चपदस्थ मराठी इंग्रजी विद्वान, अधिकारी यांनी केली होती. महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या पत्रकारांच्या प्रातिनिधीक स्वायत्त संस्थेनेही याबाबत अनेकवेळा राज्य शासनाकडे, मुंबई महानगरपालिकेकडे केली होती. अखेर सन 1993 साली या संस्थेने जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले ता.देवगड जि.सिंधुदुर्ग येथे जांभेकरांच्या अर्धपुतळ्यासह ‘दर्पण’ सभागृह उभारले. महाराष्ट्रातले व मराठी वृत्तपत्रसृष्टीतले हे पहिले स्मारक आहे. आता तरी महाराष्ट्र शासन, मुंबई महानगरपालिका, मुंबईतील सर्व वृत्तपत्रे, पत्रकार व त्यांच्या संघटना, मुंबईतील लोकप्रतिनिधी यांनी लक्ष घालून ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे भव्य राष्ट्रीय दर्जाचे स्मारक मुंबईत उभारावे यासाठी एकत्रित प्रयत्न झाले पाहिजेत. तरच 17 मे 1846 च्या जांभेकरांच्या निधनानंतरची 178 वर्षातील त्यांची मुंबईतील उपेक्षा संपेल. पत्रकार दिन खर्‍या अर्थाने संपन्न व्हायचा असेल तर हे मुंबईतले स्मारक लवकरात लवकर पूर्ण करणे हीच खरी आजच्या पत्रकार दिनी बाळशास्त्री जांभेकरांना योग्य आदरांजली ठरेल.

(लेखक महाराष्ट्र पत्रकार कल्याणी निधी (फलटण) चे अध्यक्ष म्हणून ‘दर्पण’कारांच्या स्मरण व स्मारक कार्यात गेली 36 वर्षे कार्यरत आहेत.)

Back to top button
Don`t copy text!