
स्थैर्य, फलटण, दि. 28 : तत्कालीन माणदेश इतिहासात प्रथमच “महाराष्ट्र केसरी” ही मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून देणारे पै. बापूराव लोखंडे हे १९ वे महाराष्ट्र केसरी. सन १९८१ मध्ये नागपूर येथील मैदानात पै. बापुराव लोखंडे यांनी हा बहुमान पटकावला.
महाराष्ट्र केसरी पै. बापुराव लोखंडे हे मूळचे ढवळ, ता. फलटण जि. साताराचे मात्र त्यांनी मुंबईच्या लालबहाद्दुर शास्त्री आखाड्यात “महाराष्ट्र केसरी” पै. शिवाजीराव पाचपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव सुरु करुन मुंबईचे प्रतिनीधीत्व केले, मात्र ऐनवेळी मुंबई संघातून त्यांना सहभागी होता येत नाही हे समजल्यानंतर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले, अशा प्रतिकुल परिस्थीतीत सातारा जिल्हा तालीम संघ मदतीला धावल्याने वयाच्या 31 व्या वर्षी नागपूर येथे होणाऱ्या १९ व्या महाराष्ट्र केसरी गदेसाठी पै. बापूराव लोखंडे यांनी सातारा संघातुन प्रवेश मिळविला.
माती गटातून त्यांचा महाराष्ट्रातील दिग्गज मल्लांशी मुकाबला होणार होता, मात्र पै. बापू लोखंडे यांनी कमाल केली. ईस्माईल शेख, विष्णु जोशीलकर या दिग्गज मल्लांना पराभूत करुन अंतीम सामन्यात प्रवेश केला. दुसऱ्या बाजूने गादी विभागातुन मुळचे ईदौरचे मात्र कोल्हापुरचे प्रतिनीधीत्व केलेल्या सरदार खुशहाल हे अंतीम सामन्यात समोर आले होते.
अंतीम लढतीत पहिले १५ मिनीट काटा लढत होऊन सुध्दा कोणीही गुण मिळवू शकले नव्हते, शेवटी १९ मिनीटे पुर्ण होताच पै. सरदार खुशहाल यांनी सुरेख बगल काढुन पै. बापुंची कंबर धरतो न धरतो तोच तितक्याच चपळाईने पापणी लवते न लवते पै. बापू लोखंडे यांनी “गदालोट” मारुन पै. सरदार खुशहाल यांना चीत केले, आणि इतिहासात प्रथमच “महाराष्ट्र केसरी” ही मानाची गदा सातारा जिल्ह्याला मिळवून दिली, ती महाराष्ट्र केसरी पै. बापूराव लोखंडे यांनी.
आजच्या जागतिक कुस्ती दिनाचे निमित्ताने पहिले महाराष्ट्र केसरी पै. बापूराव लोखंडे यांना हार्दिक शुभेच्छा !
महाराष्ट्र केसरी पै. बापू लोखंडे संपर्क 9594937421