दैनिक स्थैर्य | दि. ७ डिसेंबर २०२३ | फलटण |
मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील ठाम आहेत. त्यांनी सरकारला २४ डिसेंबरपर्यंत आरक्षण देण्यासाठी मुदत दिली आहे. त्यासाठी जरांगे पाटलांच्या राज्यभर सभा सुरू आहेत. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यात ठिकठिकाणी मराठा समाज बांधवांची साखळी उपोषणे सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर फलटण तालुयातील दर्याचीवाडी या गावातील ग्रामस्थांनीही मराठा आरक्षणासाठी १ डिसेंबरपासून साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस आहे. या उपोषणात ग्रामस्थांसह महिला, लहान मुलांनीही सहभाग घेतला आहे.
जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा दर्याचीवाडी ग्रामस्थांनी सरकारला दिला आहे.
या आंदोलनात नितीन जाधव, भीमराव कुमकले, हनुमंत जाधव, मालन ढेंबरे, संकेत पवार, श्रीकांत जाधव, रोहन शिंदे, आकांक्षा कदम, जगन्नाथ ढेंबरे, सिद्धू पवार, विद्या दादा कदम, प्राची पवार, गौरी सचिन कुमकले सहभागी झाले आहेत.
वरील सर्व मंडळी व त्यांचे सहकारी मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळण्यासाठी आज सातव्या दिवशी साखळी उपोषणाला दर्याचीवाडी येथे बसले आहेत.