साने गुरुजी, तुम्ही परत या..! – यशेंद्र क्षीरसागर
स्थैर्य, सातारा,दि. 11 : एखाद्या स्त्री सारखे कोमल हृदय असलेले जगातील महान शिक्षक, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ म्हणजे साने गुरुजी होत. शिक्षण क्षेत्र म्हणजे केवळ एक शासकीय अथवा नोकरी मिळवण्याचे साधन नसून शिक्षण ही तत्त्वप्रणाली आहे. शिक्षण हा जीवनाचा गाभा आहे. शिक्षण हे खरेखुरे आनंदाने जगण्याचे साधन आहे, या तत्वावर चालणारा आणि जीवननिष्ठा बाळगणारा महान शिक्षणप्रेमी अशी साने गुरुजी यांची संपूर्ण जगात ओळख आहे.
केवळ शिक्षकच नव्हे; तर समाजसेवक, समाजसुधारक, तत्त्वचिंतक, विचारवंत आणि साहित्यिक अशा चहुबाजूंनी सानेगुरुजी यांचे व्यक्तिमत्व भरलेले दिसून येते. 1899 ते 1950 अशा केवळ एक्कावन वर्षाच्या आयुष्यात त्यांनी महान शिक्षक कसे असावे याचा आदर्श घालून दिलाच; पण त्यासोबतच तब्बल 73 अत्यंत महत्वाची पुस्तके लिहून आपण श्रेष्ठ दर्जाचे आणि समाजसुधारकदृष्टीचे साहित्यिक आहोत; हे सुद्धा सिद्ध केले.”श्यामची आई” ही साहित्यकृती तर केवळ एक पुस्तक नसून किंवा केवळ एक दर्जेदार लेखन एवढाच अर्थ नसून हे पुस्तक म्हणजे आई कशी असावी आईने संस्कार कसे करावेत आईचा पुत्र कसा असावा हे सर्व दर्शविणारा एक अमृताचा ठेवा आहे. म्हणूनच साने गुरुजींना आचार्य अत्रे यांनी “अमृताचा पुत्र” असे म्हटले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे अशा महान संत प्रवृत्तीच्या विभूतींच्या विचारांच्या मुशीतून सानेगुरुजी घडले. खऱ्या अर्थाने “गुरुजी” म्हणावे असे ते दिवस होते. दुर्दैवाने आज एकविसाव्या शतकात काही शिक्षकांना गुरुजी म्हटलेले आवडत नाही. कारण इंग्रजांनी रूढ केलेला “सर” हा शब्द त्यांना प्रिय वाटतो. तरीसुद्धा एखाद्या सहकारी संस्थेत शिक्षक जेव्हा सत्तेसाठी गोंधळ घालतात तेव्हा असे वाटते की; बरे झाले, त्यांना गुरुजी म्हटलेले आवडत नाही …!
ते केवळ पगारी शिक्षक आहेत. त्यांना सर म्हटलेलेच बरे ..!!! सानेगुरुजींचे हृदय मातेचे होते, कोमल होते, त्यांना अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा यांच्याबाबत समाजाचा कळवळा होता. समाजाविषयी त्यांना तळमळ वाटे. समाजाचा उद्धार व्हावा आणि प्रत्येक पुत्र हा आदर्श पुत्र व्हावा, प्रत्येक विद्यार्थी हा आदर्श विद्यार्थी व्हावा अशी त्यांची तळमळ होती. “पत्री” नावाच्या कविता संग्रहातून त्यांची ही तळमळ स्पष्ट दिसून येते. ते केवळ शिक्षकच नव्हे; तर उत्कृष्ट कवी सुद्धा होते. आचार्य विनोबा भावे यांची गीतेची प्रवचने त्यांनी तुरुंगामध्ये असताना लिहून काढली. नाशिकच्या काळाराम मंदिरात सत्याग्रह केला. त्यांच्या महान कार्यामुळेच आचार्य अत्रे यांना श्यामची आई हा अजरामर चित्रपट निर्माण करावासा वाटला. त्यांना प्रेरणा मिळाली आणि या चित्रपटाने पहिलेवहिले भारतातले सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळवले ..!!
सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर कायम सानेगुरुजी चालतच राहिले. अनेक वाईट गोष्टी, अत्याचार, वाईट विचार यामुळे त्यांच्या मनाला खूप वेदना होत. कारण ते प्रगल्भ विचारवंत आणि अत्यंत संवेदनशील व्यक्ती होते. आजच्या शिक्षण प्रणालीत शिक्षकांनी कसे असावे याचे आदर्श आणि मूर्तिमंत उदाहरण म्हणजे साने गुरुजी होते. गुरुजी शब्द जरी उच्चारला तरी पटकन “साने गुरुजी”हेच शब्द आठवावेत इतकी त्यांची मूर्ती, कर्तुत्व आणि विचार भारताच्या समाज मनात कोरले गेले आहेत. महान साहित्यिक असलेल्या साने गुरुजी यांच्या पुस्तकांची लोकप्रियता आजही टिकून आहे. आदर्शवादी शिक्षण तसेच मनोरंजक पद्धतीने जीवनाची सुंदर तत्वे सांगणारी ही साहित्यसंपदा आहे. “करील मनोरंजन जो मुलांचे, जडेल नाते प्रभूशी तयाचे”, असे त्यांनी सार्थपणे म्हटले आहे. या वाक्यातून त्यांचे विचार मनावर ठसतात. साने गुरुजी यांची त्यांच्या आईवर अतोनात प्रेम होते. त्यांच्या आईने त्यांच्यावर; सर्वांवर प्रेम करावे, असा मूलभूत संस्कार अत्यंत प्रेमाने आणि प्रभावीपणे केला. म्हणूनच साने गुरुजी म्हणतात, “खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे “..साने गुरुजींचे मन हे संस्कारक्षम आणि संवेदनशील होते. आईच्या संस्कारातूनच त्यांच्या जीवनाचा विकास झाला. आईवर किती अतोनात प्रेम करावे; याचे आदर्श उदाहरण जर मुलांना हवे असेल तर ते साने गुरुजी यांच्या सारखे सापडणार नाही ..!!! साने गुरुजी अतिशय भावनाप्रधान होते. त्यांच्या हृदयात आईने सद्भावना पेरल्या. लेख, निबंध, कविता, कादंबरी, नाट्य संवाद, चरित्र अशा विविध साहित्य क्षेत्रात साने गुरुजींनी खूप महत्त्वाचे आणि दर्जेदार लेखन केले आहे. त्यांची लेखणी अविरत चालत होती. साने गुरुजी अत्यंत प्रेमळ हृदयाचे आणि मृदू स्वभावाचे संवेदनशील व्यक्ती होते. त्यांच्या भाषेमध्ये गोडवा आहे; तसाच बोध सुद्धा आहे ! स्नेह ,प्रेम, समाजाविषयी कळकळ ,मानवतावाद इत्यादी मानवी मूल्यांची पखरण त्यांच्या भाषेत ठायीठायी जाणवते..!!! त्यांची साधी भाषाच लोकांना आवडली. शिक्षण हा त्यांचा मनातील जणू देव्हारा होता. त्यासंबंधीचे विचार, ज्या भावना त्यांच्या मनात उचंबळून आल्या, त्या सर्व लेखणीद्वारे त्यांनी प्रकट केल्या. जगाला प्रेम अर्पावे, अशी त्यांनी कळकळीने विनंती संपूर्ण जगाला केली आहे. जातिभेद ,धर्मभेद मानु नये, दुसऱ्यांवर प्रेम करावे हाच खरा धर्म होय; राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक विषयासंबंधी त्यांनी अत्यंत प्रभावीपणे लेखन केले. म्हणूनच चतुरस्त्र व्यक्तिमत्व असलेल्या साने गुरुजी यांच्यासारख्या शिक्षकांची आज नितांत गरज आहे. अर्थात चालू परिस्थितीत एकविसाव्या शतकात उत्कृष्ट शिक्षक नाहीत असे नाही. परंतु त्यांना समाज, पालक आणि विद्यार्थी यांनी व्यवस्थित साथ द्यायला हवी. सर्व राज्यांमध्ये एकोपा असावा. सगळ्या राज्याची संस्कृती सगळ्या राज्यांना समजावी; अशी साने गुरुजींना तळमळ होती. म्हणून त्यांनी “आंतरभारती” ची स्थापना केली. यातून त्यांची उत्कट तळमळ दिसून येते. “भारतीय संस्कृती” नावाचे महत्त्वाचे पुस्तक त्यांनी लिहिले. प्रांतीयता हा भारतीय एकात्मतेमध्ये अडसर ठरू शकतो, हे त्यांनी जाणले होते. सर्व प्रांतांमध्ये बंधुभावाचे वारे वहावे, सर्वांनी एकमेकाच्या भावाप्रमाणे राहावे असे त्यांना वाटायचे. सर्व प्रांतातील भाषा सर्वांना बोलता याव्यात, अशी त्यांची तळमळ होती. त्यामुळे त्यासाठी त्यांनी काही निधीही गोळा केला होता. रवींद्रनाथ टागोर यांच्या “शांतिनिकेतन”चे उदाहरण त्यांच्यासमोर होते. म्हणून ही त्यांची सर्व धडपड होती. साने गुरुजींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये राजकारण, समाजकारण आणि शिक्षण अशा सर्वच क्षेत्रांचा सुंदर मिलाफ झाला होता. परंतु महत्त्वाची बाब ही की या सर्व क्षेत्रातील कठोरपणा त्यांच्या मनात नव्हता..!
प्रेम, आपुलकी, माणुसकी या मूलभूत सद्गुणांच्या भोवतीच त्यांचे विचार फिरत राहिले. त्यांच्या प्रत्येक साहित्यातून हे दिसून येते. त्यांच्या कविता सुद्धा प्रभावी आहेत. त्यांचे लेखन प्रभावी, तळमळीने लिहिलेले, आदर्श लेखनाचा आग्रह नसलेले आणि साधे आहे. म्हणूनच ज्ञानपीठ पुरस्कार विजेते भालचंद्र नेमाडे यांना सुद्धा साने गुरुजींचे साहित्य हे मराठीतले सर्वश्रेष्ठ साहित्य वाटते. कविता असो ,कादंबरी असो ,चरित्र असो की नाट्य संवाद असो साने गुरुजी यांनी सर्वच साहित्य प्रकारांमध्ये आपला ठसा उमटवला. श्यामची आई हा तर या सर्व साहित्यातील मुकुटमणी होय.
आज आपला महाराष्ट्र, भारत खूप प्रगती करतोय हे मान्य आहे. परंतु, त्यासोबतच शिक्षण, प्रबोधन, संस्कार यांची नितांत आवश्यकता आहे. त्याशिवाय या प्रगतीला अर्थच उरणार नाही म्हणूनच आज सार्थपणे वाटते की; साने गुरुजी तुम्ही परत या…आम्ही तुमची तळमळीने वाट पाहत आहोत…!