
ज्येष्ठ पत्रकार, उद्योजक आणि हजारो तरुणांचे मार्गदर्शक सुभाष भांबुरे यांचा आज वाढदिवस. ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारितेत योगदान देणाऱ्या या अवलिया व्यक्तिमत्त्वाचा परिचय आणि त्यांच्याविषयी शिष्य सचिन गोसावी यांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा हा विशेष लेख.
स्थैर्य, फलटण, दि. १० : फलटणच्या पत्रकारितेत गेल्या ३० वर्षांहून अधिक काळ आपल्या लेखणीचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ पत्रकार, ‘श्रीहरी टूर्स अँड ट्रॅव्हल्स’चे सर्वेसर्वा आणि हजारो तरुणांचे मार्गदर्शक सुभाष भांबुरे यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांचे शिष्य सचिन गोसावी यांनी आपल्या गुरूंप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता आणि त्यांच्या कार्याचा घेतलेला हा आढावा…
बहुआयामी व्यक्तिमत्व सुभाष भांबुरे सर हे केवळ पत्रकार नाहीत, तर एक यशस्वी उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत. सध्या ते ‘महाराष्ट्र राज्य पालखी सोहळा पत्रकार संघा’चे उपाध्यक्ष, ‘कै. हरिभाऊ निंबाळकर वाचनालया’चे अध्यक्ष, फरांदवाडी कृषिक्रांती ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन आणि छत्रपती शिवाजी महाराज वाचनालयाचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी फलटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्षपदही भूषविले असून ‘साप्ताहिक श्रीहरी सुभाषित’चे ते संपादक आहेत.
‘कृष्ण-अर्जुन’ नात्याची प्रचिती भांबुरे सरांच्या मार्गदर्शनाविषयी बोलताना सचिन गोसावी म्हणतात, “युद्धभूमीवर गोंधळलेल्या अर्जुनाला ज्याप्रमाणे श्रीकृष्णाने गीता सांगून लढण्यासाठी सज्ज केले, तसेच माझ्या आयुष्यातील संघर्षाच्या काळात भांबुरे सरांनी मला दिशा दिली. दि. १० ऑक्टोबर २०१० रोजी माझ्या पहिल्या पुस्तकाच्या निमित्ताने झालेली आमची २ मिनिटांची भेट २ तासांच्या मार्गदर्शनात कधी बदलली, हे समजलेच नाही. तेव्हापासून आजपर्यंत ते माझ्या आयुष्याच्या रथावर बसून मला अचूक मार्गदर्शन करत आहेत.”
दानशूर ‘कर्ण’ महारथी कर्ण ज्याप्रमाणे दान देताना याचकाकडे पाहत नसे, जेणेकरून दानाचा गर्व होऊ नये, अगदी तसेच सुभाष सर आहेत. त्यांनी हजारो तरुणांना स्वतःच्या पायावर उभे केले, अनेकांना ‘आयुष्यभराची भाकरी’ मिळवून दिली, पण त्याचा कधीही उच्चार केला नाही. निर्भीडता, धाडस, बुद्धीचातुर्य आणि निस्वार्थीपणा हे त्यांचे गुण वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
कुटुंबाची साथ त्यांच्या या यशामध्ये त्यांच्या धर्मपत्नी सौ. वसुधा भांबुरे मॅडम यांची मोलाची साथ आहे. या दोघांची जोडी म्हणजे ‘मेड फॉर ईच अदर’ असून, त्यांचा मुलगा यश देखील यशाची नवी शिखरे पादाक्रांत करण्यासाठी सज्ज झाला आहे.
“मी तुझ्याबद्दल अजूनही समाधानी नाही,” हे सरांचे वाक्य शिष्याला कायम अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देते. अशा या उत्तुंग व्यक्तिमत्त्वास, माझ्या गुरूस उदंड आणि निरोगी आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

