आज मराठी व हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणा-या अभिनेत्री रीमा लागू यांचा जन्मदिन (जन्म. २१ जून १९५८)

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


स्थैर्य, सातारा दि. 21 : रीमा लागू यांचे लग्ना आधीचे नाव नयन भडभडे. एक उत्तम अभिनेत्री म्हणून प्रेक्षकांना रीमा लागू यांचं नाव सुपरिचित होते. हुजूरपागा शाळेत शिकत असताना विद्यार्थी दशेतच त्यांच्या अभिनयाची नोंद घेतली गेली. मराठी रंगभूमीचा वारसा त्यांना त्यांच्या आईंकडून आला. ‘हिरवा चुडा’, ‘हा माझा मार्ग एकला’ अशा चित्रपटांतून ‘बेबी नयन’ नावाने बालकलाकार म्हणून रीमा लागू यांनी चित्रपट सृष्टीत सुरवात केली व लवकरच त्यांच्या व्यावसायिक कारकिर्दीला सुरुवात झाली.

७०-८० च्या दशकात मराठी रंगभूमीवर व नंतर मराठी, हिंदी चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका केल्या. १९८० सालच्या ’आक्रोश, ‘कलयुग’ या दर्जेदार चित्रपटांपासून त्यांच्या चित्रपटप्रवासाला सुरुवात झाली. ‘रिहाई’सारखी धीट, वेगळ्या वाटेवरची भूमिका असो, किंवा ‘कयामत से कयामत तक’, ‘मैंने प्यार किया’, ‘हम आप के हैं कौन’, ‘वास्तव’, ‘कल हो ना हो’ मधल्या भूमिका, आपल्या सहजसुंदर अभिनयानं त्यांनी मोठा पडदा कायमच व्यापला होता. चित्रपटातील आई म्हणून त्यांची ओळख होती. विशेषत: अभिनेता सलमान खानची आई म्हणून त्यांनी अनेक चित्रपट केले. त्यांनी केलेल्या नाटकातील पुरूष, सविता, घर तिघांचं हवं आत्ताचं छापाकाटा अशी बरीच नाटकं प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली, काही नाटकं तितकी चालू नाही शकली. पण हे करत असताना त्या ब-याच व्यक्तिरेखा नाटकाच्या माध्यमातून जगत होत्या. नाट्य अभिनेते विवेक लागू यांच्याशी लग्न झाल्यानंतर त्या नयन भडभडे च्या रीमा लागू झाल्या. रीमा लागू  यांनी ‘श्रावणसरी’ या मालिकेच्या दोन कथांचे दिग्दर्शन केले होते. रीमा लागू यांनी ’अनुमती’ या पुरस्कारप्राप्त चित्रपटात अतिशय महत्त्वाची भूमिका केली होती. गजेंद्र अहिरे यांनी दिग्दर्शन केलेल्या या चित्रपटातली त्यांची भूमिका अनेक चित्रपटमहोत्सवांत नावाजली गेली आहे. तसेच ’तू तू मैं मैं’ ही रीमा लागू यांची अतिशय गाजलेली आणि स्वच्छ, साधी सरळ टीव्ही मालिका सर्वांच्याच पसंतीस उतरली होती. त्या मालिकेनंतर त्यांनी ’तुझं माझं जमेना’ या मालिकेमधून काम केले होते. रीमा लागू यांचे १९ मे २०१७ रोजी निधन झाले. रीमा लागू यांना आपल्या समूहाकडून आदराजंली.

संजीव वेलणकर, पुणे. ९४२२३०१७३३


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!