स्थैर्य, १२ : हिंदी चित्रपटसृष्टीत ‘खलनायक’चा परिपाठ निर्माण करणारा मराठी भाषिक अभिनेता मोहन जोशी हे मराठी चित्र-नाट्यसृष्टीतील एक सुपरिचित नाव आहे. त्यांचा जन्म बंगळुरू येथे झाला, पण त्यांचे बालपण पुण्याला गेले. त्यांच्या आईचे नाव प्रमिला होते. न्यू इंग्लिश स्कूल या शाळेत त्यांचे माध्यमिक शिक्षण झाले आणि त्यानंतर बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स या महाविद्यालयात त्यांनी वाणीज्य शाखेचे शिक्षण घेतले. त्यांना अभिनयाची आवड उपजतच असली तरी प्रत्यक्ष प्रशिक्षण मात्र मिळाले नाही. भरत नाट्य मंदिराचे संचालक बाबूराव विजापुरे यांच्याकडून नाटकाचे काही प्राथमिक धडे त्यांनी गिरवले. मोहन जोशी यांनी महाविद्यालयीन शिक्षणानंतर १९७५ साली किर्लोस्कर ऑईल इंजिन्स या कंपनीत सात-आठ वर्षे नोकरी केली. त्याच वर्षी म्हणजे १६ फेब्रुवारी १९७५ रोजी त्यांचा विवाह झाला आणि त्याच वर्षी ‘मोरूची मावशी’ या नाटकात त्यांना काम करण्याची संधी मिळाली. लहान-मोठ्या व्यावसायिक नाटकात काम करत असतानाच मराठी चित्रपटसृष्टीकडेही त्यांची पावले वळली. १९८१ साली ‘रावसाहेब’ या मराठी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. खर्जामध्ये लागणारा खडा आवाज, कसदार आणि सहजसुंदर अभिनयशैली यामुळे मोहन जोशी हे नाव नाट्य-चित्रपटसृष्टीमध्ये वरच्या वर्तुळात घेतले जाऊ लागले. ‘रावसाहेब’ या चित्रपटाला महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार मिळाला. १९८८ साली ‘मिल गयी मंझिल मुझे’ या हिंदी चित्रपटामध्ये त्यांनी काम केले. हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत साधारणपणे ५५० चित्रपटांतून त्यांनी भूमिका केल्या.
१९९७ साली प्रदर्शित झालेल्या ‘घराबाहेर’ या चित्रपटातील भूमिकेसाठीही त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचा पुरस्कार, तसेच राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला. १९९३ सालच्या ‘सवत माझी लाडकी’ या चित्रपटातही बीना (नीना कुळकर्णी) यांच्या इरसाल, डॉक्टर पतीची विनोदी ढंगाची भूमिका त्यांनी केली. ‘तू तिथं मी’ या १९९६ साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटात निवृत्तीनंतर पत्नीपासून दुरावलेल्या एका कुटुंबवत्सल पतीची त्यांनी वठवलेली भूमिका लक्षणीय ठरली. भावनांचे अनेक पदर उलगडणार्या या अभिनयकौशल्यासाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार देण्यात आला. याच भूमिकेसाठी फिल्मफेअर पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले. मिश्कील आणि विनोदी भूमिका रंगवण्याची हातोटी असलेले मोहन जोशी अष्टपैलू अभिनेते म्हणून ओळखले जातात. २०१० साली आलेल्या ‘बे दुणे साडे चार’ या चित्रपटातील विनोदी भूमिकेसाठी त्यांना ‘उत्कृष्ट विनोदी अभिनेता’ म्हणून महाराष्ट्र शासनाच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’ चित्रपटात त्यांनी केलेली व्यवहारकठोर वकिलाची भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय ‘सरीवर सरी’, ‘दिवसेंदिवस’, ‘मु.पो. लंडन’, ‘तुझ्या माझ्यात’ यासारख्या अनवट विषयांवरील चित्रपटातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. अलीकडच्या काळातील ‘जाऊं द्या ना बाळासाहेब’ हा त्यांचा उल्लेखनीय चित्रपट. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये मोहन जोशी यांनी ‘खलनायका’ची कारकिर्द स्वतंत्रपणे घडवली. मराठी कलाकाराचा हिंदी चित्रपटसृष्टीतील सहज वावर, भाषेवरची उत्तम हुकमत आणि भूमिकेत स्वानुभवातून पडलेली भर या गुणांनी मोठमोठ्या निर्मिती संस्थांचे, महत्त्वाचे हिंदी चित्रपट त्यांच्या नावावर जमा आहेत. ‘भूकंप’, ‘ऐलान’, ‘टक्कर’, ‘जीत’, ‘हलचल’, ‘हकीकत’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘मृत्युदंड’, ‘जुडवा’, ‘सलाखे’, ‘बारूद’, ‘वास्तव’, ‘आज का रावण’, ‘बागबान’, ‘गंगाजल’ अशा चित्रपटातून चरित्र भूमिकेवर स्वतःचा ठसा उमटवला आहे.
नाट्य-चित्रपटसृष्टीप्रमाणे दूरदर्शन मालिकांमध्येही मोहन जोशी यांचा मोठा सहभाग आहे. ‘ऊनपाऊस’, ‘अग्निहोत्र’, ‘धनंजय’, ‘भैरोबा’, ‘गुंडा पुरुष देव’, या मालिकांमधूनही त्यांच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळाल्या. त्यांनी २००३ पासून अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. तसेच त्यांनी २०१० साली अमेरिकेमध्ये न्यू जर्सी येथे विश्व नाट्यसंमेलन भरवले होते. अभिनयाव्यतिरिक्त ‘जिव्हाळा’ या ट्रस्टच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग आहे. या संस्थेतर्फे नाट्य-सिनेक्षेत्रातील गरजू कलाकारांना मदत दिली जाते. अशा अनेक उपक्रमात सहभागी होताना त्यांची अभिनयक्षेत्रातील वाटचालही सुरूच आहे. भोजपुरी चित्रपटातही ते सातत्याने काम करत आहेत.
– नेहा वैशंपायन