मोठ्या लोकांच्या शेजारी उभं राहिलं, म्हणजे मोठं होता येतं की नाही ते माहित नाही, पण चांगल्या लोकांच्या सोबतीत राहून नक्कीच मोठं होता येतं. “जया अंगी मोठेपण तया यातना कठीण” या संतवचनाप्रमाणे मोठेपण अनेक कालावधीची समर्पण सेवा असते. नानाविध प्रसंगाना सामोरे जाणं. ध्येयापासून तूसभर ही मागे न हटणे. चांगले काम करणा-या अधिकारांना धमक्या, अपहरण, प्रसंगी मृत्युला सामोरे जाणं. बदली आणि मरण मी स्विकारायला तयार आहे. आश्या निधड्या छातीच्या अधिकारी हे महाराष्ट्र भूमीचे शौर्य आहे.
मोठेपण हे वंशपरंपरेने मिळालेले वेगळे, आपण दिसताच आपल्या श्रीमंतीने तोंडदेखल मोठेपण वेगळे, फायद्यासाठी होयबा वर्गाकडून मिळालेले मोठेपण वेगळे, कुठं त्याच्या नादी लागता म्हणाना मोठे ते वेगळे, हुजरेगीरी, मुजरेगीरी, चमचेगीरी यातून मिळालेले मोठेपण वेगळे.सहवास, संगतीत मिळालेले मोठेपण वेगळे आणि स्वकर्तृत्वाने मिळालेले छोटेसे का असेना पण ते मोठेपण खरे.
संत सहवास, चांगले विचारधन, प्रबोधनात्मक व्याख्याने, आदर्शवत जीवनशैली, ध्येयवेडी माणसं याच्या विचारात सानिध्यानाने मिळालेले मोठपण कोणीच हिरावून घेत नाही.
टाकीचे घाव सोसल्याबिगर देवपण येत नाही. त्या पद्धतीने जनता जनार्दनाने तुमची चहूबाजूने परीक्षा घेतल्याशिवाय मोठेपण प्राप्त होत नाही. सोनं शुद्ध आग्निपरिक्षेतूनच मोठेपण सिद्ध करते.