मराठी वरीस समाप्ती अन् नव्या वर्षाची चाहूल देणारा फाल्गुन मास. पानगळ सुरु झालीय. मातीचा हात घट्ट धरुन झाडं ताठ मानेनी बोडकी होत चाललीत. एकेक झाड निष्पर्ण होत चाललंय पुन्हा नव्याने बहरण्यासाठी; महिनोमहिने झाडांना बिलगलेली, जपलेली सगळी पानं.
सर्व विकार वासना गळून पडाव्यात तशी गळून मातीला भेटतायत. जागा करून देताहेत नव्यानं येणाऱ्या पानांसाठी. कर्तव्य संपलं की जागा सोडायची असते. नव्यानं येणाऱ्या हिरव्या पानांनीही हे समजून घ्यायचं असतं. आपणही उद्या गळून पडणार आहोत हे भान ठेवायचं असतं. सगळं झाड निष्पर्ण होवून स्वतःला नव्यानं शोधतंय.
कधीतरी आपणही या झाडासारखचं निष्पर्ण व्हावं पुन्हा बहरण्यासाठी; जुन्या विचारांना गाडून नवनिर्मितीचा ध्यास घ्यावा. खरंतरं प्रत्येक ऋतू आपल्याला काहीतरी शिकवून जातोय. हे निसर्ग चक्र आम्ही नीट समजून घेतलं पाहीजे.
जेंव्हा एखाद्या गोष्टीचा शेवट होतो तेंव्हा हमखास जगण्याला अर्थ देणाऱ्या एका नव्या सुखद गोष्टीची ती सुरुवात असते. शिशिरातील आजची पानगळ ही वसंतातील बहराची चाहूल असते. फक्त ती कळली पाहिजे. हे ज्याला कळतं त्याचं जगणं निश्चित बदलतं.
आपल्या जीवनातील वयस्क व ज्येष्ठ महातारे पानगळी प्रमाणे अनुभवाचे गाठोडे नव्या पिढीकडे देऊन समाधानाने निर्वाणीकडे वाटचाल करतात. उमलत्या पिढीने त्यांच्याच मस्तीत न जगता शिस्तीने पानगळ झालेल्या पानांवरुन चालताना आवाज न करता, चूरगळून व तुडवून पुढे जाताना हळूवारपणे वाटचाल केल्यास जीर्ण उन्हाळे पावसाळे झेललेली पानगळ निश्चितच आपल्या जीवनाचा जीर्णोद्धार करणार.