कुठल्याही वयात शरीर निरोगी असणे आवश्यक आहे. शरीर निरोगी असेल तरच जीवनाचा आनंद लुटता येईल. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आयुर्वेदात अनेक उपाय सांगितले आहेत.
आचार्य चरक यांनी चरक संहिता या ग्रंथात औषधे कशी तयार करायची ? निरनिराळ्या व्याधींवर उपचार पद्धती शोधल्या. आयुर्वेदाचा भरपूर प्रचार केला.
त्यांना एकदा असे वाटले की आपण एवढे श्रम घेतले ते किती फळास आले ते समक्ष पाहूया. म्हणून ते वैद्यांच्या बाजारात गेले. त्यांनी एका वैद्याला विचारले – “निरोगी कोण असतो ?”
पहिला वैद्य :- “जो रोज च्यवनप्राश खातो,तो निरोगी असतो.”
दुसरा वैद्य :- “जो रोज चंद्र प्रभा वटी खातो, तोच निरोगी असतो.”
तिसरा वैद्य :- “जो रोज त्रिफळा चूर्ण खातो, तोच निरोगी असतो.”
चौथा वैद्य :- “ही उत्तरे चुकीची आहेत, जो रोज सुवर्ण भस्म घेतो, तोच निरोगी असतो.”
चरकाचार्यांना वाईट वाटले, मी जे काही सर्व केले ते लोकांचे पोट औषधांचे कोठार बनवण्यासाठी केले नाही. ते खूप खिन्न झाले. विचार करत करत ते नदी काठी आले. त्यावेळी आयुर्वेदाचे एक वैद्य वाग्भट स्नान करून पाण्यातून बाहेर येत होते. त्यांना चरकाचार्यांनी ओळखले.
त्यांनाही चरकाचार्यांनी तोच प्रश्न निरोगी कोण ? विचारला.
वैद्य वाग्भट यांनी उत्तर दिले :- “हितभुक, मितभुक, ऋतभुक निरोगी असतो.”
चरकाचार्यांना खूप आनंद झाला. त्यांनी वाग्भटांना कडकडून मिठी मारली.
हितभुक म्हणजे :- हितकर पदार्थ सेवन करणारा.
मितभुक म्हणजे :- मोजकेच खाणारा.
ऋतभुक म्हणजे :- चांगल्या मार्गाने मिळवलेल्या पैशाचे अन्न खाणारा.
असाच मनुष्य निरोगी असतो.