पुस्तकांची मैत्री असणारे वाचक यांचा विचारांवर वचक असतो. पुस्तकांची शिदोरी जन्मभर पुरणारी प्रेरणादायी भावी पिढीची शिल्लक आहे.
आपल्या घरातील वातावरण शांत हवे असल्यास वाचन वाढवा. बघा परिणाम सकारात्मकच येणार. घरात भौतिक साधनाची रेलचेल आहे. प्रतिष्ठेपायी महागाडे फर्निचर, भव्य दिव्य टी व्ही सेट, झुंबर, शोपीस चे अजब नमुने, लटकवलेले प्राण्यांचे मुखवटे, गुबगुबीत सोफासेट, विद्युत रंगीबेरंगी रोषणाई याने आपली गृह(ग्रह) सजावट छानच दिसते. त्याच घरात देवघरा बरोबरच ग्रंथघर हवे. विविध वाड्मयीन साहित्य कलाकृतीचे दर्जेदार संग्रही असावे.
वाचलेली पुस्तकं मस्तक घडवतात. ते कोणाचे हस्तक होत नाही. जग त्याच्या पुढे नतमस्तक होते. एवढी ताकत पुस्तकांच्या मैत्रीत आहे. आपल्या पाल्यांना आजूबाजूच्या वाचनालय, ग्रंथालय, अभ्यासिका या ज्ञान मंदिरात नेऊन वाचन दर्शन सोहळा घडवावा. महाबळेश्वर पर्यटना बरोबरच भारतातील पहिले पुस्तकांचे ग्राम भिलार दाखवावे. साहित्य संमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमात हजेरी लावून अक्षर (अक्षय) वाड्मय आणावे व प्रसंगी भेट द्यावे.
आज पुस्तकं वाचण्यासाठी आपल्याला किंडल, आॕडिओ बुक्स अशी अनेक वेगवेगळी माध्यमं उपलब्ध आहेत. परंतु मला विचाराल तर मी आजही हातात पुस्तक घेऊन ते वाचण्यालाच प्राधान्य देतो. नव्या को-या पानाला स्पर्श व अक्षर नजर भेट हा सोहळा अविस्मरणीय. चला तर पुस्तकाला जवळ करुन शरीर व मनातील जळमटे बाजूला सारुन अंर्तबाह्य निर्मळ होऊ या. मग ठरलं तर रोज वाचायचे व आपले जीवन वाचवायचे. वाचतायना.