
एक पारधी (शिकारी) रात्रीच्या समयी जंगलात शिकार करण्यासाठी तयारीने जातो. एका झाडावरून प्राणी मात्राची वाट पाहत असतो. शेजारी निर्मळ व स्वच्छ तळे वजा पाणवठा आहे. त्या पाणवठ्यावर मध्यान्ह समयी हरीण येते. पाण्याच्या आशेने ती बिचारी सावध पाणी पिण्यास सुरुवात करते. शिका-याला चाहुल लागताच तो धनुष्याला तीर लावतो. व नेम धरुन बाण सोडणार एवढ्यात हरिण सावध होऊन मनुष्य वाणी बोलते, “शिकारी दादा, मला मारु नकोस. माझी पाडस वाट पाहतात.”
शिकारी, “माझी ही बायको, मुले उपाशी आहेत.मी शिकार करणार”
“मी पाडसाला दुग्धपान करुन परत येते”
“कश्यावरुन”
“एक लेकुरवाळ्या आईचा बोल आहे”
“ठीक आहे. परत ये, वाट पाहतोय”
जड अंतकरणाने हरीण पाडसाजवळ पोहचली. पाडसांना स्तनपान करताना दूध कडवट लागत होते. सारी हकिकत हरीणीने कथन केल्यावर पाडसा सह ती शिका-या जवळ आली.
तो रात्रभर ज्या वृक्षावर बसला होता.ते बेलाचे झाड होते. हरीणीची वाट पाहत पाहत बेलाची पाने तोडून खाली टाकीत होता. खाली शिवलिंगावर ती अर्पित होत होती. कळत नकळत शिवमहिमा जागृत होऊन शिकारी प्रवृत्ती बदलली. ती रात्र महाशिवरात्र होती. शिका-याने शिकार सोडून घरचा रस्ता धरला. परिवर्तनशील सोहळा म्हणजे महाशिवरात्री उत्सव होय.
खरंच शिवभक्ती भोळी भाबडी व लगेच फलप्राप्ती करणारी देवता आहे. विषारी सर्पाला जवळ करणारी, डमरु व त्रिशूल रुपाने मृत्युची साक्ष देणारी, स्मशान रुपी शांतता देवता, सागर मंथनांतून हल पचविणारी संहारक देवता म्हणजे मानवी जीवन व्यहाराचे कालचक्र शिवदेवता होय.
जीवात्मा व शिवात्मा यांचे संयोगीकरण, जीवाचे रक्षण, जीवन मुक्तता, दुसऱ्या योनीत प्रवेश यांचे समीकरण महाशिवातून मिळते.
महाशिवरात्री निमित्तानं शिवमंदिरात दर्शन, भजन, प्रवचन, कीर्तन, महाप्रसाद यासह स्वच्छता, शिवलिला ग्रंथ परायण, ग्रंथ वाटप, वृक्षांना जलाभिषेक, पाखरांना शिवमूठ तांदूळ, गरजूंना दूध, शिधा अर्पण, पाणपोई सेवा केल्यास शिव नक्कीच प्रसन्न होऊन आशीर्वाद देणार. शिवाला फक्त मनापासून भावभक्ती व पान फुलं समर्पण हवे. बाकी शिवलिंगावर दूधाचा अभिषेक म्हणजेच गरजवंताच्या मुखी दुध पोहचवणे. उपवास म्हणजे खाण्यातील बद्दला बरोबर स्वभाव बद्दल करणे. बेलाचे वृक्ष रोपण व दान करणे. बोला हर हर महादेव. ओम नमो शिवाय.
प्रत्येक जीवात्मा आनंदानं जगणं म्हणजे महाशिवरात्री करणं