चिता एकदाच जाळते पण चिंता आयुष्यभर जाळत राहते.यापरीस चिंतन करावे. पण सध्याच्या युगात मिळाल्या परीस अजून मिळावे या आशेने नुसतं मृगजळाच्या पाठीमागे धावून थकत जातो. आपल्या परीस ज्याच्याकडं अधिकंच आहे. ते पाहून हे मिळवण्यासाठी अधिकंच धावतंय अन् तिथंच फसतंया. कारण त्यांन कष्टानं मिळवलेल उपभोगायाच सोडून पळत्याच्या पाठीमागं लागून हातचं पण जातंय अन् पळतं पण घावना अशल्यातली गत होतीया.
भगवंताने सर्वांना दिलंय पण हाव मात्र शांत बसू अन् स्वास्थ्य लाभू देईना. यावर उपाय मंजे चवीने खावे, समाधानी रहावे, मन भरकटू न देता रमवावे, आपणाला पाहिजे किती अन् थांबावे कोठे यांचे भान असावे. शेवटी किती कमवले तरी शेवटी हिथंच ठेऊन मोकळ्या हाताने जायचंय. हे कळतं असून ही आपण पळतं असू तर देवाची पाळत आपणावर नक्कीच आहे. हे मात्र कदापि विसरु नका.
सध्या तर गरीब भाकरीसाठी धावतंय अन् श्रीमंत भाकरी पचनी पडावी म्हणून पळतंय. गरीबाला पैसा मिळावा म्हणून राबावे लागतंय अन् श्रीमंताला पैसा लपविण्यासाठी जागावे लागतंय. गरीब भाताच्या गोळ्यांशी जेवतं अन् श्रीमंत नुसत्या गोळ्याच खातंय. स्पर्धा, तुलना, ईष्या करु नका. भगवंताने बराबर दिलेले आहे. आपल कसं झालंय दात हायती तर चणं नाहीत. अन् काहीकडं चणं हायती तर दात नाही. नशीबाने चण्याची अन् दाताची गाठ पडली तर चावायची बोंब मग बसा आविष्यभर बोंबलत. चणचण, कणकण, फणफण, भणभण, वणवण असावी पण धावधाव अन् हावहाव मर्यादित असावी.