चंदन सानीवर उगळलं की सानीला सुगंध, उगळणाऱ्याच्या हाताला सुगंध, भगवंताच्या मस्तकाला सुगंध एवढेच काय ज्या कुर्हाडीच्या पात्याने घाव घालून तोडले त्याला ही सुगंध. चंदनचा सुगंध हाच अंतःकरणचा गुण हीच खरी संपत्ती.
उमलेली कोणतीही फुलं विकायच ठरवलं तर फुले सुध्दा तराजुत टाकावी लागतात, विकणार्याने फुलांचं वजन विकाव. सुगंधवेडया माणसानं वजनात किती फुल येतात हे मोजू नये. त्याची किंमत न करता सुगंधाने भारावून जावे. फुलांची किंमत होईल पण सुगंधाची किंमत अंतःकरणच करणार.
आयुष्यात तुम्ही कितीही शिकलात, पैसा, धन दौलत, पद, प्रतिष्ठा, सत्ता, नावलौकिक, मानसन्मान आणि नाव कितीही कमवलतं तरीही माता, पिता, गुरू, शिक्षक यांच्या आशीर्वादाशिवाय सर्वकाही व्यर्थ असतं.
चुका स्विकारण्याची तयारी ठेवली की माणसं गमावण्याची वेळ येत नाही. चुक कबूल करायला फार मोठे अंतःकरण असावे लागते.
प्रत्येकाला आनंदी व समाधानी ठेवणे आपल्या हातात निश्चित नाही.पण प्रत्येकाबरोबर आनंदी व समाधानी रहाणे हे मात्र निश्चितच आपल्या हातात आहे. समाधान ही अंत:करणाची, सर्वात सुंदर संपत्ती आहे. ज्याला ही संपत्ती मिळाली, तो जगात सर्वात सुखी मनुष्य आहे.
आपली सुखाची कल्पना पैसा, अडका, गाडी, माडी, ताडी, होयबाचा वर्ग ही नश्वर संपत्ती हीच खऱ्या अर्थाने आपत्ती आहे. आज गुबगूबीत गादी आहे. पण झोप नाही. पाचीपक्वाने समोर पण पथ्य हजर. कळसूबाईचं शिखर सर करायच पण उठता बसता येईना. अमाप पैका पण ईडीच भीती. गोळ्या, इंजेक्शन याबिगार भोजन नाही.
समाधान रुपी अंतःकरणाची संपत्ती कमविण्यासाठी शरीर रुपी इंद्रिये रथाला मन नावाच्या उधळणाऱ्या घोड्याला लगाम घालून काबूत ठेवणे. या साठी वाचन, लेखन, श्रवण, छंद, दातृत्व, हसणे, खेळणे सर्वात महत्वाचे दुसऱ्याला कमी न लेखता सन्मानित करणे.
धरणीवर अंग टाकल्यावर आपले मन आपल्या साक्ष देते. अंतःकरणातील गोळाबेरीज जीवनाच्या पटलावर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार रुपाने निद्रादेवतेच्या स्वाधीन करते. आपले अंतःकरण आपल्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करते. त्यावेळी आरोपी, वकील, साक्षीदार, न्यायधिश आपले अंतःकरण असते. सारं कळतं पण वेळ निघून गेलेली असते. फुलं जास्त तराजूत बसावी. या नादातच सुंगध घेण्याच विसरुन जातो. वेळीच सावधान.