शब्दात परकेपणाचा गंध आला की, मायेची फुलपाखरे कधीच उडून गेलेली असतात. फुलं उमलली की त्यांचा सुगंध वाऱ्यासवे पसरतो. अन् चहोदिशेला पांगलेली व फुलांच्या सुगंधासाठी वेडीपिशी फुलपाखारे फुलांकडे आकर्षित होतात.
आताच्या काळात निसर्गातील फुलपाखरे अन् आपली लेकरं जवळ येणचं दुरापस्त होऊन बसलंय. धड मोकळ्यापणे बोलता अन् सांगता येईना. नुसती घुसमट वाढत चाललीया. शब्दांतील गोडवा, आपलेपणा, जवळीक यांची सांगड जुळेना. तुटलेपणा, अबोलपणा, बोलायाच म्हणून बोलणे, वरवरचं बोलणं, काळजाला भिडणारे, नातं तोडणारं, कुजकं, लेकी बोले सूनं लागे, आडवं बोलणं, हमरी तुमरी बोलणं, ठसक्यात बोलणं, घुश्यात तिरकस बोलणं, हो ला हो, कानाडोळा करणे, बोलाचं बोलणं यामुळे आपलेपणाचा सुगंधी दरवळ नाहीसा होऊन परकेपणाची चाहूल जाणवते.
आजची परिस्थिती भयानक आहे. घराघरातील यंत्रे बोलतात अन् चालती बोलती माणसं मूकपणे मूग गिळून बसली आहेत. शेजारी शेजारी संवादाचा अभाव, भावकी, गावकी, मित्र परिवार, नातेवाईक यांच्यातील बोलणं जुजबी अथवा कामापुरतचं उरले. त्यामुळे जवळीच आनंदाने लहानपणी एकत्र खेळली बागडलेली सवंगडी सुद्धा परकी झाली.
परकिय आक्रमण पचवून देशाला स्वातंत्र्य मिळवले. पण आताच्या काळातील आपल्यातलाच परकेपणा परकिया परीस भयाण वाटतोय. जगण्यातील सुंदर संवादाची फुलपाखरे दूरदेशी गेल्यावर एकाकी वटवृक्षाची पाळेमुळे डगमगू लागतात. बहरलेल्या आम्रवृक्षाला वाळवीने आतून पोखरावे. तसं मानवी नात्यांत शब्दांचा गंध नाहीसा झाल्याने फुलपाखरे फिरकानात.
चला तर आपलेपणाचा सुगंध चहुमुलखात, असमांतात, दशदिशांना, वाऱ्यासवे, नात्यासंगे, भाव – भावकीत, जनामनांत पसरुन दुरावलेली सर्व आपलीच पण आपल्या परकेपणामुळे, अहंपणामुळे, हट्टापायी जवळ असूनही दुरची वाटणारी बोलून जवळ करु. सुरुवात करतायना मी तुमच्या पासून करतोय. वाट कसली बघताय बघा तो आपलेपणाचा थवा पुन्हा सुगंधीत करण्यासाठी झेपवतोय.