आजकाल शेतकऱ्यांची मुले शेती करतोय असे सांगताना लाज बाळगतात. तसेच शेतकऱ्यांच्या मुलांना कोणी मुली देत नाहीत. म्हणून माझ्या शेती करणाऱ्या मित्राच्या मुलाने शेतकरी असल्याची लाज न बाळगता अभिमानाने गाडीवरच मी शेतकरी असे फुलांनी सजवले.
शेतीकरी मुलगा नको. ही मानसिकता मुलींच्या व तिच्या घरातील सदस्यांच्या डोक्यातून काढून टाकली पाहिजे. सद्य परिस्थितीत कायम स्वरुपाच्या व हमी पगाराच्या नोकऱ्या नाहीत. वाढती बेरोजगारी, महागाई, बेभरोसाची अल्पकालीन नोकरी, तुटपुंजी कमाई, मिजासपणाचा वाढता खर्च, आजारपण, आपत्तकालीन संकटे यातून सावरता सावरता नाकी नव येतय. तरी सुद्धा नोकरी शिवाय छोकरी हे सूत्रच समजेना.
मुलीकडील नोकरी पाहिजे अन् भक्कम ७/१२ हवा असे स्थळ शोधतात. आमच्या मुलींला रानातंल काही येत नाही. ती नव-याबरोबर शहरात जाईल. मग शेती कशासाठी सासू सास-यांनी कष्ट करुन तुम्हांला हातभार लावण्यासाठी. ही मानसिकता बदलायला हवी.
शेती शिवाय मजा नाही. स्थावर पिढ्यान पिढ्या राहते. उद्या नोकरी धंद्यात दुर्दैवाने काही अडचण निर्माण झाल्यास काळी आईचा आधार मोठा आहे. कष्ट व घाम गाळल्यास सुखात जगता येतं. सगळ्याची किंमत होईल. पण शेतीची किंमतच करता येणार नाही. तेव्हा समाज मनाने शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ठेवल्यास शेतकऱ्यांच्या लेकरांना नववधूच्या रुपात लक्ष्मी भेटेल.