प्रत्येक दुखण्यावर दवाखान्यातच उपचार होतात असे नाही, काही दुखणी कुटुंब आणि मित्रमंडळी यांच्याबरोबर हसण्या, खेळण्याने ही बरी होतात.
कुटुंबातील मतभेद चार भिंतीच्या आत असावेत. भिंतीला कान असतात. घरोघरी मातीच्या चुली. घर तिथं पर अन् भावकी उणेची वाटेकरी. भांड्याला भांड लागल्यावर आवाज येणारच. पण आवाज हसण्याचा, खिदळण्याचा, सहानुभूतीचा, तडजोडीचा, आपलेपणाचा, संवादाचा, समजूतीचा असावा.
मोठ्या मोठ्या कुटुंबातील दुखणी सांगता व चारचौघांत बोलता येत नाही. पद, प्रतिष्ठा, श्रीमंती, मी पणा यामुळे नुसती मानसिक घुसमट सोसावी लागते. यापरीस गरीब कुटुंबातील वातावरण हसून, खेळून, असेल त्या परिस्थितीत आनंद मानून जगतात.
खरंच कुटुंबातील दुखण्यावर दूरदर्शन, भ्रमणध्वनी व व्यसन ही औषधे नसून एकत्रित भोजन, हसून खेळून आनंदी रहाणे. ज्येष्ठांचा सन्मान व लेकरांचे संगोपन हाच दवा आहे.
सगळ्यात महत्त्वाचे कुटुंबातील येणारी लक्ष्मी कष्टाची व सन्मार्गाची असल्यावर दुखणे पासंगाला रहाणार नाही. लबाडी, धूर्तपणा, लावालावी, चाडी, निंदा नालस्ती, टीकाटीपणी या अवदसेरुपी स्वभाव गुणांनी दुखणे वाढते.
चला तर घराचे घरपण हसणे, खेळणे, बोलणे या औषधी रुपी वातावरणाने बहरत ठेऊ या.