आज २६ मार्च – विदेशी पेये परीस देशी रस बरा

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

उन्हाळा (मार्च हिट) सुरू आहे. जहिरातीतील विदेशी २० रुपयांच्या पेय्यासाठी जीव धोक्यात (खोटं नाटं) घालून इकडे तिकडे माकड उड्या मारणा-या हिरोगत आपण तसं नाही करायचं.

आपण सरळ नवनाथ रसवंती गृहात जायचं आणि खुळू खुळू घुंगराच्या तालावर दंग होऊन उसाचा ताजा रस प्यायचा. ते पण आयोडीन युक्त सैधंव मीठ टाकून, रसरशीत लिंबू, आल्याचा तुकडा मिसळून रस पिल्यास आरोग्याला योग्य व पोषक घटक मिळणार.

रासायनिक पेये पिण्यापेक्षा नैसर्गिक रस प्या व दोन पैसे शेतकऱ्याला मिळू दया. भारतातील पैसा भारतातच राहू द्या. नुसतं रस पिणे हे कार्य नसून रसवंती गृहाचे बारकाईने निरीक्षण करणे गरजेचे आहे. रसवंती गृहाबाहेरील हिरव्यागार वाढ्यासकट ऊस मोळी (पुंड्या) हेच सांगते की, तरुण्यात आहे. शोभून दिसतोय. मिरवतोय. अकर्षीत करतोयस. पण हे तारुण्य काही काळाचे नतंर बघ मागे जसं जसं गिऱ्हाईक लागेल. तसं तसं धारदार कोयत्याने तुकडे तुकडे करुन संसाररुपी व घुगंराच्या तालावर चरक्यातून चिपाड होईपर्यंत सुट्टी नाही. रस ना रस निघल्यावर टिफाडात अथवा पोत्यात भरुन जाळायला मोकळेच. हे त्रिवार सत्य नाकरता येत नाही.

संसारात सुद्धा रस (पैसा) असे पर्यंत अनेक प्रकारची गिऱ्हाईक (नातेवाईक) वेगवेगळ्या चरक्यांतून रस काढून चोथा करतात. आपण मात्र चरक्यातून बाहेर पडल्यानतंर नाराज न होता. या ऊस रूपी देह्याचा गोड रस म्हणून उपयोग झाला. याचा परमानंद मानावा. ऊस खाल्ला, फोडला, पिरगळला, मोडला, तोडला, ठेचला, चेचला, चरक्यात घातला तरी गोडच (संसाररुपी सुख). समाज आपले काम करतो. आपण आपला चांगुलपणा व गोडवा सोडू नये. इतर पेय (देशी,विदेशी) पिण्यापरीस ऊसाचा रस बाधत तरी नाही. लक्ष्यात ठेवा ऊस गोड लागला म्हणून मुळासकट खाऊ नये. कलिगंड, खरबूज, लिंबू सरबत, माठातील वाळा युक्त थंडगार जल (माठ गरीबाचा श्रीमंती आरोग्य संभाळणारा फ्रीज) वापरणे, समजतंय ना.

ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा,काय भुललाशी वरलिया रंगा

आपलाच रसग्रहणकर्ता – प्रा.रवींद्र कोकरे – ग्रामीण कथाकार,

श्रीमती प्रेमलाताई चव्हाण हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण.
९४२१२१६८२१


Back to top button
Don`t copy text!